पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. ग्रीसमधील अथेन्स शहरात पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी पीएम मोदी यांना 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर' ने सन्मानित केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या ऑर्डर ऑफ ऑनर या सन्मानाची स्थापना 1975 मध्ये झाली आहे. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीसच्या राष्ट्रपतींद्वारे पंतप्रधान आणि मान्यवरांना प्रदान केला जातो ज्यांनी त्यांच्या विशेष स्थानामुळे ग्रीसच्या प्रगतीमध्ये योगदान दिले आहे. या सन्मानामध्ये पीएम मोदी यांना देण्यात आलेल्या प्रशस्तिपत्रकात "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारतातील मैत्रीपूर्ण लोकांचा सन्मान करण्यात येत आहे' असा उल्लेख करण्यात आला असल्याचे वृत्त 'NDTV' ने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२५) ग्रीस दौऱ्यावर आहेत. ग्रीसच्या नवनिर्वाचित पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. ग्रीसला भेट देणारे गेल्या ४० वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी १९८३ मध्ये भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी ग्रीसला गेल्या होत्या.