किणी, पुढारी वृत्तसेवा : चीनमध्ये झालेल्या 'वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये पेठवडगाव येथील अभिज्ञा पाटीलने नेमबाजीत सुवर्णपदक मिळवले होते. तिच्या या कामगिरीची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. रविवारी झालेल्या 'मन की बात' या कार्यक्रमात मोदींनी अभिज्ञाशी संवाद साधला. हा माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात संस्मरणीय क्षण असल्याचे अभिज्ञाने दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले.
अभिज्ञा म्हणाली, मला ज्यावेळी समजले की, पंतप्रधान आपल्याशी बोलणार आहेत, त्यावेळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला. यापूर्वी मी मोदींना भेटले आहे; परंतु ती सामूहिक भेट होती; यावेळी मोदी थेट माझ्याशी बोलत होते. ते माझ्याशी ज्या तन्मयतेने बोलत होते, खेळाविषयी माहिती घेत होते, ते पाहून मी भारावलेे. त्यांनी मला खूप प्रोत्साहित केले. त्यांच्याशी बोलल्यामुळे 2024 च्या ऑलिम्पिकचे पदक आपण मिळवू, असा आत्मविश्वास मला आला आहे. आता माझे प्रयत्न त्याद़ृष्टीने असतील.