PM Modi : अंदमान आणि निकोबारमधील २१ बेटे परमवीर चक्र विजेत्‍यांच्‍या नावाने ओळखली जातील : पंतप्रधान

PM Modi : अंदमान आणि निकोबारमधील २१ बेटे परमवीर चक्र विजेत्‍यांच्‍या नावाने ओळखली जातील : पंतप्रधान
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंदमान आणि निकोबार द्विपसमुहातील  २१ बेटे आता परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जातील. येणाऱ्या पिढ्या हा दिवस स्वातंत्र्याच्या अमृताचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणून लक्षात ठेवतील. ही बेटे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणास्थान असतील, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांनी आज व्‍यक्‍त केला. अंदमान आणि निकोबारच्या २१ बेटांना २१ परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, "अंदमानमध्ये ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकवला, तिथे आज गगनचुंबी तिरंगा आझादी हिंद सेनेच्या पराक्रमाचे गुणगान करत आहे.  समुद्रकिनारी फडकणारा तिरंगा पाहून येथे येणाऱ्या लोकांमध्ये देशभक्तीचा रोमांच वाढतो. अनेक दशकांपासून नेताजींच्‍या जीवनाशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी होती, हे कामही पूर्ण निष्ठेने पुढे नेले. आज आपल्या लोकशाही संस्थांसमोरील 'कर्तव्यपथावर' नेताजींचा भव्य पुतळा आपल्याला आपल्या कर्तव्याची आठवण करून देत आहे."

 ही कामे फार पूर्वीच व्हायला हवी होती

देशाच्या हितासाठी ही कामे फार पूर्वीच व्हायला हवी होती. ज्या देशांनी आपल्या महान पुरुष आणि महिलांना जनतेशी कालानुरूप जोडले ते देश विकासाच्या आणि राष्ट्र उभारणीच्या शर्यतीत खूप पुढे गेले. आज स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात भारत तेच काम करत आहे. 21 परमवीर चक्र विजेते, ज्यांच्या नावाने ही बेटे ओळखली जातील, त्यांनी मातृभूमीच्या प्रत्येक कणाला आपले सर्वस्व मानले होते. त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता. ते वेगवेगळ्या राज्यातील होते; पण भारतमातेवरील अतूट भक्ती त्यांना एकत्र जोडत असे, त्यामूळे त्यांच्यात एकता निर्माण व्हायची. ज्याप्रमाणे समुद्र वेगवेगळ्या बेटांना जोडतो, त्याचप्रमाणे 'एक भारत-श्रेष्ठ भारत' ही भावना भारतमातेच्या प्रत्येक बालकाला जोडते, असेही पंतप्रधान मोदी म्‍हणाले.

आपल्या सैन्याने प्रत्येक प्रसंगी आणि प्रत्येक आघाडीवर आपले शौर्य सिद्ध केले आहे. राष्ट्रीय संरक्षणाच्या मोहिमांमध्ये स्वतःला समर्पित करणाऱ्या सैनिकांची व्यापक ओळख व्हावी, हे देशाचे कर्तव्य होते. आज देश ते कर्तव्य, जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज देशाची ओळख सैनिक आणि सैन्याच्या नावाने होत आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

PM Modi : अनेक दशके अंदमान-निकोबारकडे दुर्लक्ष

बोलत असताना पंतप्रधान नरेंंद्र मोदी म्हणाले, पूर्वी लोक अंदमानात समुद्र किनारे आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येत असत, पण आता अंदमानशी संबंधित स्वातंत्र्याचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकताही वाढत आहे. आपली ईशान्येकडील राज्ये आणि अंदमान-निकोबार बेटांसारख्या भागांचा नेहमीच दुर्गम भाग म्हणून विचार केला जातो. अशा विचारसरणीमुळे अनेक दशके अशा भागांकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. अंदमान-निकोबार बेटही याचे साक्षीदार आहे.

देशातील आधीच्या सरकारांच्या अनेक दशकांच्या विकृत वैचारिक राजकारणामुळे न्यूनगंड आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे देशाची क्षमता नेहमीच कमी लेखली गेली. मला विश्वास आहे की आपण असा भारत निर्माण करू जो  असेल आणि आधुनिक विकासाच्या शिखरांना स्पर्श करेल. आज अंदमान – निकोबारमध्ये इंटरनेट सुविधा वाढली असून डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना फायदा होत आहे. असेही पंतप्रधान मोदी यांनी स्‍पष्‍ट केले.

मोठ्या  बेटाला मेजर सोमनाथ शर्मा यांचे नाव

21 बेटांपैकी सर्वात मोठ्या असलेल्या बेटाला मेजर सोमनाथ शर्मा यांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय कॅप्टन करम सिंग, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नायक जदुनाथ सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हामिद, ले. कर्नल अर्देशिक तारापोर, लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाईंग आॅफिसर निर्मलजीतसिंग सेखों, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोजकुमार पांडे, सुभेदार मेजर संजय कुमार आणि योगेंद्र सिंग या परमवीरचक्र विजेत्यांची नावे बेटांना देण्यात आलेली आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news