पुढारी ऑनलाईन डेस्क :आज संसदेच्या नवीन सभागृहात विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मांडत, सभागृहाच्या कामाजाचा श्रीगणेशा केला. नारी शक्ती वंदन विधेयकाची त्यांनी घोषणा केली. महिलांची धोरणनिर्मितीमध्ये मोठी भूमिका आहे. महिला आरक्षण लागू करण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे, असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (PM modi on Women's Reservation Bill )
संसदेच्या नवीन इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहात खासदारांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "महिला आरक्षण विधेयकावर बराच वेळ चर्चा झाली. अटलबिहारी वाजपेयींच्या राजवटीत अनेकवेळा महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले; पण विधेयक मंजूर होण्यासाठी पुरेसे बहुमत नसल्याने हे स्वप्न अधुरेच राहिले. महिला आरक्षण लागू करण्यासाठी देवाने माझी निवड केली आहे. हे स्वप्न पुढे नेण्याची संधी दिली आहे. आमचे सरकार आज दोन्ही सभागृहात महिलांच्या सहभागावर एक नवीन विधेयक आणत आहे." (PM modi on Women's Reservation Bill )