LPG price cut | पीएम मोदींनी महिलांना दिली रक्षाबंधनाची भेट, सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय सर्वांसाठी घेतला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील महिलांना दिलेली ही भेट आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (LPG price cut)
"रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने सरकारने घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याचा आणि उज्ज्वला योजना (एलपीजी सबसिडी) ७३ लाख महिलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे," असे ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिलिंडर किमतीतील कपात उज्ज्वला योजनेत नोंदणी केलेल्या ग्राहकांनाही लागू असेल. याचाच अर्थ लाभार्थ्यांना आता प्रति १४ किलोचा एलपीजी सिलिंडरवर एकूण ४०० रुपये अनुदान मिळेल.
विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे १,१०३ रुपये, १,१२९ रुपये, १,१०२.५० रुपये आणि १,११८.५० रुपये एवढी आहे. जुलैमध्ये तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ केली होती, त्यानंतर मे महिन्यात दोनवेळा दरवाढ केली होती.
याआधी ऑगस्ट महिन्यात पहिल्या तारखेला तेल कंपन्यांनी व्यावयासिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. परंतु, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केला नव्हता. आता २०० रुपयांनी सिलिंडर स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. (LPG price cut)