नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशभरातील १५० पेक्षा जास्त स्टार्टअपशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. ग्रोइंग फ्रॉम रूट्स, नजिंग डीएनए, स्थानिक ते जागतिक, भविष्यातील तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्रात जगज्जेते घडवणे आणि शाश्वत विकास या सहा संकल्पनांवर स्टार्टअप्सनी पंतप्रधानांसमोर सादरीकरण केले. या वर्षीपासून दरवर्षी १६ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय स्टार्ट अप दिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणादेखील पंतप्रधान मोदी यांनी केली.
भारतातील स्टार्टअप्स ५५ विभिन्न उद्योगांसह काम करीत आहेत आणि स्टार्टअप्सची संख्या पाच वर्षांपूर्वी ५०० पेक्षा कमी होती, ती आज ६० हजारांहून अधिक झाली आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. स्टार्ट-अप्स नवीन भारताचा कणा ठरणार आहेत. गेल्या वर्षी देशात ४२ युनिकॉर्न तयार झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. हजारो कोटी रुपयांच्या या कंपन्या स्वावलंबी आणि आत्मविश्वासपूर्ण भारताचे प्रमाणचिन्ह ठरल्या आहेत. आज भारत झपाट्याने युनिकॉर्नचे शतक पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, भारतातील स्टार्टअप्सचा सुवर्णकाळ आता सुरू होत असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याचे आकर्षण निर्माण करून देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशात ९००० हून अधिक अटल टिंकरिंग लॅब मुलांना शाळेत नवोन्मेषाची आणि अभिनव कल्पनांवर काम करण्याची संधी देत आहेत. जास्तीत जास्त तरुणांना नवनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
हेही वाचा