सांगली : बापरे! तुरुंगातूनच दरोड्यांचे ‘प्लॅन’

सांगली : बापरे! तुरुंगातूनच दरोड्यांचे ‘प्लॅन’

सांगली, सचिन लाड : नोकरी मिळावी, यासाठी प्रथम मुलाखत घेतली जाते, हे सर्वज्ञात आहे. पण चक्क दरोडा टाकण्यासाठी मोबाईलवर 'व्हिडीओ कॉन्फरन्स'द्वारे मुलाखत घेऊन तब्बल दोनशे जणांची टोळी तयार करणारा देशातील कुख्यात दरोडेखोर 'सुबोधसिंग' सध्या बिहार राज्यातील बिऊरच्या (पटणा) तुरुंगात आहे. दरोडा टाकण्यासाठी प्रत्येक साथीदाराला महिन्याला चार ते पाच लाख रुपये पगार देऊन एकप्रकारे कंपनीच चालवित असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरोड्यांची मालिकाच!

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्स या पेढीवर भरदिवसा दरोडा टाकून घेणारा टोळीचा म्होरक्या सुबोधसिंग सध्या त्याच्या गुन्हेगारी कारनाम्याने देशभरात चर्चेत आला आहे. 'सुबोधसिंग'…बिहार राज्यातील नालिंदा (जि. चंडी) त्याचे गाव…इयत्ता आठवी उत्तीर्ण असलेल्या या दरोडेखोराने चार वर्षांत सराफी पेढ्या आणि फायनान्स कंपन्यांना टार्गेट करून दरोड्याची मालिकाच रचली आहे. तुरुंगात बसून मोबाईलवरून सूत्रे हलवून दरोडे यशस्वी टाकून घेत आहे. चार वर्षांपासून अनेक राज्यात त्याने धुमाकूळ घालत पोलिसांना 'सळो की पळो' करून सोडले आहे.

साथीदारांची मोठी फळी

चार वर्षांपासून त्याने दरोड्याची मालिकाच रचली आहे. बिहार, राजस्थान, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील सांगली या शहरात त्याने आतापर्यंत दरोडे टाकले आहेत. प्रत्येकवेळी दरोडा टाकण्यासाठी वेगवेगळ्या साथीदारांचा त्याने उपयोग केला. त्याच्या नावावर सात मोठे दरोडे टाकल्याची नोंद आहे. सातपैकी केवळ एका गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. तीन वर्षांपासून तो तुरुंगात आहे. केवळ सोने आणि रोकड लुटण्याचा त्याचा उद्देश आहे. देशभरातील अनेक सराफी पेढ्या, बँका व फायनान्स कंपन्या त्याच्या 'रडार'वर आहेत.

सात राज्यात वॉन्टेड

नोकरी आणि राजकीय आश्रयाच्या पाठबळावर सुबोधसिंग दरोड्याचे गुन्हे करण्यासाठी मागे-पुढे पाहत नाही. कारागृहात अनेक कैदी असतात. त्यांच्याशी तो ओळख करून घेतो. दरोडा टाकण्यासाठी महिन्याला चार ते पाच लाख रुपये पगार देण्याचे तो आमिष दाखवितो. महिन्याला पगार मिळत असल्याने आतापर्यंत त्याच्या टोळीत दोनशे साथीदार सहभागी झाले आहेत. कुठल्या राज्यातील शहरात दरोडा टाकायचा आहे, याचे तो तुरुंगात बसून नियोजन करतो. हा दरोडा टाकण्यासाठी कोण साथीदार घ्यायचे, याचा विचार करून तो मोबाईलवर 'व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखत घेतो. तो जसा कट रचेल, त्याचपद्धतीने गेले तरच दरोडा यशस्वी होतो. सात राज्यात टाकलेल्या प्रत्येक दरोड्यात तो 'वॉन्टेड' आहे. (क्रमशः)

भाड्याच्या खोलीत मुक्काम

सुबोधसिंग दरोडा टाकण्यासाठी सात ते आठ साथीदार एकत्रित करतो. यातील एकाला प्रथम ज्या शहरात दरोडा टाकायचा तिथे पाठविले जाते. हा साथीदार महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, असे सांगून भाड्याची खोली घेतो. ओळखपत्रासाठी खोली मालकाला बनावट आधार कार्ड दिले जाते. आठ दिवस तिथे राहून तो 'रेकी' करतो. त्यानंतर साथीदारांना बोलावून घेतो. दरोडा टाकल्यानंतर ते पुन्हा या खोलीवर येतात. आठ-दहा दिवस राहून वातावरण शांत झाले की, ते दुसर्‍या राज्यात आश्रयाला जातात.

पिस्तूल, काडतुसे, अलिशान वाहनांचा पुरवठा

दरोडा टाकण्यासाठी तुरुंगात बसूनच सुबोधसिंग त्याच्या साथीदारांना पिस्तूल, काडतुसे व अलिशान वाहनांचा पुरवठा करीत आहे. प्रत्येक दरोड्यासाठी जुने वाहन खरेदी केली जाते. दरोडा टाकल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी हे वाहन दहा ते बारा किलोमीटरवर सोडून दुसर्‍या वाहनांतून त्याचे साथीदार पसार होतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news