वॉशिंग्टन : शून्य गुरुत्वाकर्षणाची मजा घेण्यासाठी अनेक अब्जाधीश अंतराळ पर्यटन करीत असतात; मात्र या पृथ्वीतलावरच काही ठिकाणे अशी आहेत जिथे गुरुत्वाकर्षण नेहमीसारखे काम करीत नाही. यापैकी एक ठिकाण तर भारतातही आहे!
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सांताक्रूझ नावाचं एक ठिकाण आहे, जिथे एक 'मिस्ट्री स्पॉट' आहे. या ठिकाणी माणूस खाली झुकल्यानंतरही सहज संतुलन साधत उभा राहू शकतो व तो खाली पडत नाही. या ठिकाणी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सामान्यपणे काम करत नाही. हा परिसर केवळ 150 चौरस फूटमध्ये पसरलेला असून त्याचा शोध सन 1939 मध्ये लागला होता. अमेरिकेतील मिशिगनमध्ये आणखी एक असेच रहस्यमय ठिकाण आहे, जिथे गुरुत्वाकर्षण काम करत नाही. 1950 मध्ये हे ठिकाण सापडले. या ठिकाणाला 'सेंट इग्नास मिस्ट्री स्पॉट' म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी देखील तुम्ही हवे तसे वाकून उभे राहू शकता आणि तुम्ही तेथे पडणारही नाही.
'कॉसमॉस मिस्ट्री स्पॉट' नावाचं एक रहस्यमयी ठिकाण आहे. या ठिकाणीही गुरुत्वाकर्षण काम करीत नाही. हे ठिकाण अमेरिकेच्या साऊथ डकोटामध्ये आहे. गुरुत्वाकर्षण कार्य करत नसल्यामुळे येथील झाडेही विचित्र पद्धतीने वाकलेली दिसतात. भारतात लडाखच्या लेहमध्ये 'मॅग्नेटिक हिल' नावाचे एक ठिकाण आहे.या टेकडीच्या उतारावर जर तुम्ही वाहने थांबवली आणि उभी केली तरी ती आपोआप वर चढू लागतात, तीही 20 किमी प्रतितास वेगाने!