पिंपळनेर : व्हाट्सॲप ग्रुपवर मुलींचे फोटो व्हायरल…. मोबाईल हॅक झाल्याने प्रकार घडल्याचे शिक्षकाचे म्हणणे

पिंपळनेर : सायबर क्राईम पोलिसांकडे निवेदन देताना आदिवासी संघटनेचे पदाधिकारी. (छाया: अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : सायबर क्राईम पोलिसांकडे निवेदन देताना आदिवासी संघटनेचे पदाधिकारी. (छाया: अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्याच्या दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील एका शिक्षकाने महाविद्यालयाच्या व्हाट्सॲप ग्रुपवर मुलींचे नको ते फोटो व्हायरल करून आदिवासी मुलींची बदनामी केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि तांत्रिक तपास करुन संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आदिवासी संघटनेकडून निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

महिना उलटूनही संशयित शिक्षकावर कोणतीही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या नेतृत्वाखाली आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुळे येथील सायबर क्राईम पोलिसांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. तर दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात साक्री तालुक्यातील आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत असून त्यांची निवास व भोजन व्यवस्था शासकीय आदिवासी वसतीगृहात करण्यात आली आहे.

नेमके काय घडलं?
दि. 9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास इयत्ता अकरावी सायन्स ग्रुप, साक्री तालुका आमदार ग्रुप, बल्हाणे ग्रुप या वेगवेगळ्या व्हाट्सॲप ग्रुपवर विद्यार्थींनीचे अश्लील फोटो व्हायरल झाले. धक्कादायक म्हणजे फोटो व्हायरल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचा शिक्षक अविनाश भटू पाटील होता. या शिक्षकाने त्याच्या व्हाट्सॲप क्रमांकावरून अश्लील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून आदिवासी मुलींची प्रतिमा कलंकित केली. केवळ आदिवासी समाजातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला काळीमा फासण्याचे कृत्य शिक्षकाने केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बघ्यांमध्ये महिला वाॅर्डन सुध्दा
दहिवेल येथील शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृहाच्या गृहपाल रीना जाधव यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. वसतिगृहाच्या गृहपाल म्हणून मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे  प्रकार घडल्यानंतर त्यांनी लगेच गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी प्राचार्यांना पत्र लिहून जबाबदारी झटकली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

शिक्षकाने केले हात वर 
मोबाईल हॅक झाल्याने हा प्रकार घडल्याचे शिक्षक अविनाश भटू पाटीलचे म्हणणे आहे. तर मोबाईल हॅक झाल्याबाबत सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आली असून तक्रारीबाबत अद्याप कोणताही तपास झालेला नसल्याने व्हाॅट्सॲप कंपनीकडून माहिती मिळाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news