अभ्यासातून व्यक्तिमत्त्व विकास

अभ्यासातून व्यक्तिमत्त्व विकास

Published on

अभ्यास याचा आपण घेतलेला अर्थ, शालेय इतकाच मर्यादित अर्थाने आपण वापरत असतो. अभ्यास ही व्यापक संकल्पना आहे. यामध्ये इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त व स्वत:चा द़ृष्टिकोन या सर्वांचा समावेश होतो.

आयुष्यात आपले ध्येय साध्य करत असताना आपणास विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही समस्या सोडविणे हाच खरा अभ्यास आहे. समस्या आहे तिथे उत्तर आहे. प्रश्न पडणे व त्यावर विचार करणे हाच खरा जीवन घडविण्याचा मार्ग आहे. आपण शालेय जीवनापासून मुलांमध्ये विचार करण्याची पद्धत विकसित केली पाहिजे. अनुकरण करणे आमचे विशेष काही नाही. पण विचार करून स्वत:चा मार्ग स्वत: निवडणे फार आवश्यक आहे. आपल्या द़ृष्टिकोनात आपण बदल करून आपले आयुष्य आपण बदलू शकतो.

माणसाचे व्यक्तिमत्त्व हे चारित्र्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये, सकारात्मक द़ृष्टिकोन यावर आधारित असते. यशस्वी होण्यासाठी मजबूत पायाची आवश्यकता असते. हा पाया वय वर्षे 3 नंतर घडत असतो. आपण कुणाच्या संपर्कात येतो. सामाजिक वातावरण, अनुभव व आपणास मिळालेले गुण यावरून आपली मनोधारणा ठरत असते. घरातील शाळेतील वातावरण, प्रसारमाध्यमे, धार्मिक पार्श्वभूमी, परंपरा आणि श्रद्धा, राजकीय परिस्थिती, आपण करत असलेले वाचन या सर्वांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडत असतो. कोणत्याही यशामध्ये 85 टक्के वाटा हा तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा असतो. तर 15 टक्के वाटा तुमच्या शिक्षणाचा व माहितीचा असतो. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर चांगल्या संधी आपल्याला प्राप्त होतात.

शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे; तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर तुमची कार्य करण्याची क्षमता वाढते, गुणवत्ता वाढते, सामाजिक जाणीव वाढते, व्यक्तिमत्त्व प्रसन्न राहते आपली जबाबदारी आपल्याला कळते. नकारात्मक दृष्टिकोन असलेले, आपल्या अपयशाचे खापर आपले आई-वडील, शिक्षक, जीवनसाथी, अर्थव्यवस्था, शासनव्यवस्था आणि सर्व समाज यावर फोडून मोकळे होतात. पण प्रश्न सुटत नाहीत. सकारात्मक दृष्टिकोन असणारे व्यक्तिमत्त्व आशावादी असते. त्याला बंद पडलेलं घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा अचूक वेळ दाखवते याचा शोध लागलेला असतो. नकारात्मक दृष्टिकोन असणारे लोक नेहमीच टीका करतात. लहान मुलांना आकार देणं हे कुटुंब व समाज यावर खूप आधारित आहे. त्यासाठी त्याच्यासमोर सकारात्मक बीजारोपण करणे फार आवश्यक आहे. त्याची मनोधारणा ही सुपिक व आशादायी ठेवणे ही काळाची गरज आहे. आयुष्यात पुस्तकी ज्ञानासोबत अनुभवाची जोड देणे फार आवश्यक आहे.

आज आपण आपल्या मुलांना बुद्धिवर्धक बनवत आहोत. त्यांना भावनात्मक बनवणे हीसुद्धा काळाची गरज आहे. माणूस हुशार असेल; पण भावनाशून्य असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण (AI), म्हणतो तो आणि माणूस यात फरक राहणारच. (पूर्वार्ध)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news