दलबदलू शिवाजीराव नाईकांना जनता थारा देणार नाही : सम्राट महाडिक

दलबदलू शिवाजीराव नाईकांना जनता थारा देणार नाही : सम्राट महाडिक

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : शिराळ्याच्या माजी आमदारांनी राजकारणासाठी संस्थांचा वापर केल्याने त्या अडचणीत आल्या. यामध्ये भाजप पक्ष व इतरांचा संबंध येतोच कुठे? स्वार्थासाठी सातत्याने पक्ष व भूमिका बदलणाऱ्या नाईक यांना मतदारसंघातील जनता आता थारा देणार नाही, असा पलटवार भाजप कार्यसमितीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी माजी मंत्री शि‍वाजीराव नाईक यांच्यावर केला. ते आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सम्राट महाडिक म्हणाले की, भाजप पक्ष सोडताना नाईक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माझ्यावर टीका केली आहे. भाजपमुळे आमच्या संस्था अडचणीत आल्याचे ते सांगत आहेत. मुळातच त्यांनी आजपर्यंत राजकारणासाठीच संस्थांचा वापर केला आहे. त्यामुळे संस्था अडचणीत आल्या. यामध्ये कोणत्या पक्षाचा व व्यक्तीचा संबंध येत नाही. ते ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. तो पक्ष मतदारसंघात वाढावा, यासाठी त्यांनी किती योगदान दिले, असा सवालही महाडिक यांनी यावेळी केला.

ते म्हणाले, शिवाजीराव नाईक व त्यांच्या संस्था अडचणीत याव्यात म्हणून कोणाचा हस्तक्षेप असण्याचा प्रश्नच नाही. तसेच विधानसभेला माझ्या बंडखोरीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व इतर कोणाचेही पाठबळ नव्हते. त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे योग्य नाही. न‍ाईक यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी स्वार्थासाठी सातत्याने पक्ष बदलले आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजप पक्षाला काहीही फरक पडणार नाही. दलबदलू नाईक यांना शिराळा मतदारसंघातील जनता आता थारा देणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news