सातारा : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु असताना त्यांनी देशातील प्रख्यात उद्योजक गौतम अदानी यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. याच कालावधीत भाजप विरोधातील आघाडीचे प्रमुख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र सातत्याने अदानींना भेटत होते. पवार – अदानींच्या भेटींवरुन सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रीय राजकारणात बरीच खळबळ माजली होती. मात्र, या भेटींचे गुपीत उलगडले नव्हते. रविवारी सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी कारखान्याचे चेअरमन आ. मकरंद पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला असून शरद पवार व अदानींच्या 'त्या' काळातल्या भेटी किसन वीर कारखान्यासाठी होत्या, असे म्हणून 'त्या' भेटींचे गुपीत उलगडले आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हिंडेनबर्ग या परदेशी संस्थेने आरोप केले होते. त्यानंतर संसदेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयावर विरोधकांनी लक्ष्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अदानी उद्योग समूहातील कथीत व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी करत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद पाडले होते. एका बाजूला भाजपविरोधी सर्व राष्ट्रीय पक्ष अदानींविरोधात आक्रमक झाले होते. त्याचवेळी भाजपविरोधी आघाडीचा प्रमुख घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार मात्र अदानींविरोधात चकार शब्द बोलत नव्हते. यातच दि. 20 एप्रिल 2023 रोजी शरद पवार यांच्या सिल्हवर ओकवर अदानी त्यांना भेटायला आले होते. पवार आणि अदानी यांच्या या भेटीची राष्ट्रीय राजकारणात जोरदार चर्चा झाली होती. पवारांच्या भूमिकेकडेही संशयाने पाहिले जात होते. वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांत बातम्या वहात होत्या. मात्र, पवार-अदानी भेटीचा खुलासा झालेला नव्हता. अदानी सिल्हवर ओकवर का गेले होते याचे गुपीत अजूनही बाहेर आले नव्हते. प्रत्येकाने स्वत:च्या सोयीने त्याचे अर्थ लावले होते. सुमारे 2 तास पवार-अदानींमध्ये काय चर्चा झाली याचे कोडे उलगडले नव्हते.
दि. 20 एप्रिल रोजी झालेल्या या भेटीचे गुपीत दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारी सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभावेळी उलगडले. कारखान्याचे चेअरमन आ. मकरंद पाटील यांनीच त्या काळातील सर्व घटनाक्रम सांगितला.
किसन वीर कारखाना कमालीचा अडचणीत आहे. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी त्याकाळात लक्ष घातले होते. अदानींची सिल्हवर ओकवरील भेट ही किसन वीर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच होती, असा गौप्यस्फोट आ. मकरंद पाटील यांनी रविवारी केला.
आ. मकरंद पाटील म्हणाले, टिव्हीवर आणि वर्तमानपत्रांमध्ये त्याकाळी जोरदार बातम्या सुरू होत्या. अदानी पवारसाहेबांना भेटले म्हणून टीव्हीवर दाखवले जायचे, वेगवेगळी कारणे सांगितली जायची. मात्र, खरे कारण वेगळेच होते. किसन वीर सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांनी थेट अदानी यांनाच चर्चेला बोलावले होते. सुमारे 2 तास आमची त्यांच्याशी चर्चाही झाली. या चर्चेचे फोटो आम्ही कधीच व्हायरल केले नाहीत. कारखाना अडचणीतून बाहेर यावा एवढाच आमचा उद्देश होता. त्यासाठी अनेक उद्योजकांच्या आम्ही भेटी घेतल्या होत्या, त्यात अदानीही होते, असेही आ. मकरंद पाटील म्हणाले.
यामुळे तब्बल सहा महिन्यांनंतर पवार-अदानी सिल्हवर ओकवरील भेट का झाली होती? याचे गुपीत बाहेर आले आहे. माध्यमांमध्ये त्या काळात वेगवेगळ्या चर्चा घडल्या. मात्र, पवार-अदानी भेटीचा केंद्रबिंदू सातारा जिल्हा होता हे आता समोर आले आहे. आ. मकरंद पाटील यांनी ही भेट किसन वीर कारखान्यासाठी झाल्याचे म्हटले असले तरी पवारांच्या भेटीनंतरही अदानींनी किसन वीर कारखान्याला मदत केली नसल्याचेच पुढे स्पष्ट झाले आहे.
शरद पवार-अदानी भेटीवरुन उठलेली राळ
1भाजपविरोधी महाआघाडी आक्रमकपणे ज्यांच्याविरोधात बोलत होती ते गौतम अदानी शरद पवारांना भेटल्यानंतर एकच राळ उठली होती. भाजप अथवा भाजपमधील कोणीही नेता तेव्हा अदानींची थेट बाजू घेत नव्हता. उलट संयुक्त संसदीय समितीची मागणी सभागृहात सुरु होती. याच कालावधीत ही भेट झाल्याने मोठा संशय कल्लोळ उडाला होता.
2हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी यांच्या विरोधात रान उठले होते तेव्हा शरद पवार यांनी जेपीसी ऐवजी ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडून होणे न्यायसंगत ठरेल, अशी भूमिका आधीच मांडली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील यांनी या भेटींवर प्रकाश टाकल्याने 'त्या' भेटींचा केंद्रबिंदू किसन वीर कारखाना असल्याचे समोर आले आहे.