नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : New Parliament Building : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी विरोधी पक्षांना उद्देशून केली. प्रत्येक कार्यक्रमावर राजकारण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 28 तारखेला नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. याआधीच्या पंतप्रधानांनीही संसद भवन इमारत परिसरातील वास्तुंचे उद्घाटन केलेले आहे. त्यामुळे ज्या विषयावर राजकारण करण्याची गरज नाही, त्या विषयावर विरोधकांनी राजकारण करु नये, असे प्रल्हाद जोशी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसदेचे उद्घाटन करण्याऐवजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमावर बहिष्कार घातला जाणार असल्याचे 19 विरोधी पक्षांकडून सांगण्यात आले आहे.