Parliament No confidence Motion: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभसंकेत! पीएम मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

Parliament No confidence Motion: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभसंकेत! पीएम मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Parliament No confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नऊ वर्षांत दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात आहे. सभागृहातील संख्याबळ पाहता हा प्रस्ताव अयशस्वी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल (दि. 9) लोकसभेत सरकारच्या वतीने उत्तर देण्यात आले. आज (दि. 10) स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावाबाबत बोलत ​​आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…

मणिपूरमध्ये कोर्टाचा एक निर्णय आला. तिथे काय होते आहे हे आपल्याला माहिती आहे. तिथे जी परिस्थिती निर्माण झाली, हिंसाचार उसळला, त्यात अनेक कुटुंबांना त्रास झाला. अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. महिलांबाबत गंभीर अपराध झाले. हे अपराध अक्षम्य आहेत. दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून प्रयत्न करत आहे. देशाच्या सर्व नागरिकांना मी आश्वस्त करू इच्छितो की नजीकच्या भविष्यात शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल. मणिपूर पुन्हा एकदा नव्या आत्मविश्वासानिशी पुढे जाईल.

मणिपूरच्या स्थितीवर अमित शाहांनी बुधवारी दोन तास सविस्तर माहिती दिली. सरकारची चिंता व्यक्त केली. त्यातून जनतेला जागृत करण्याचाही प्रयत्नही होता. मणिपूरपर्यंत एक संदेश पोहोचवण्याचाही प्रयत्न होता. मणिपूरच्या समस्येवर मार्ग शोधण्याचा तो प्रयत्न होता. पण राजकारणाशिवाय काही करायचेच नाही म्हणून विरोधकांनी हे सगळे केले आहे.

आम्ही म्हटले होतं की फक्त मणिपूरवर चर्चा करू. पण त्यांच्यात साहस नव्हते, इच्छा नव्हती, पोटात पाप होते. दुखत पोटात होते आणि फोडत होते डोके. अमित शाहांनी मणिपूरबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर या लोकांनी काय काय खोटे पसरवले होते, ते सगळ्यांना समजलं. यादरम्यान, मणिपूरवर बोलण्याची मागणी करत विरोधकांनी मोदींचे भाषण चालू असतानाच सभात्याग केला.

काँग्रेस पक्षाला कधीच भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. पाकिस्तान सीमेवर हल्ले करत होता. दहशतवादी हल्ले होत होते. नंतर जबाबदारी झटकत होता. यांचं पाकिस्तानशी प्रेम होतं की ते लगेच पाकिस्तानवर विश्वास बसायचा. हे तर म्हणायचे की पाकिस्तान सांगत आहे तर खरंच सांगत असेल.

काँग्रेसच्या सत्ताकाळात भारतात गरिबी वाढतच गेली. १९९१ मध्ये देश कंगाल व्हायच्या स्थितीत होता. काँग्रेसच्या शासनकाळात अर्थव्यवस्था जगात १०-११-१२ व्या क्रमांकावर होती. २०१४नंतर भारतानं पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. काँग्रेसच्या लोकांना हे वाटत असेल की हे जादूच्या कांडीनं झालंय. पण निश्चित नियोजन आणि कठोर मेहनतीच्या जोरावर देश इथवर पोहोचला आहे – मोदी

ही 'इंडिया आघाडी' नसून घमंडिया आघाडी आहे. आता प्रत्येकजण नवरदेव बनू इच्छितो. सगळ्यांनाच पंतप्रधान बनायचे आहे. त्यांनी हाही विचार केला नाही की कोणत्या राज्यात कुणाबरोबर तुम्ही कुठे पोहोचला आहात? पश्चिम बंगालमध्ये तुम्ही तृणमूलसोबत आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात आहात. दिल्लीत मात्र एकत्र आहात.

मतदारांना भुलवण्यासाठी गांधी नावही त्यांनी चोरून घेतले. काँग्रेसची निवडणूक चिन्ह दोन बैल, गाय-बछडा आणि नंतर हाताचा पंजा हे सगळे त्यांच्या वृत्तीलाच दाखवते. सगळे एका परिवाराच्या हातात केंद्रीत झाल्याचेच हे दर्शवत आहे.

काँग्रेसशी जोडलेली कोणतीच गोष्ट त्यांची नाही. निवडणूक चिन्हापासून विचारांपर्यंत सर्वकाही काँग्रेस त्यांचे असल्याचा दावा करतेय. पण ते इतर कुणाकडून घेतले गेले आहे. आपल्या कमतरतांना लपवण्यासाठी निवडणूक चिन्ह आणि विचारही चोरले. पण तरी झालेल्या बदलांमध्ये पुन्हा पक्षाचा गर्वच दिसतो. 2014 पासून ते नकाराच्याच भूमिकेत आहेत. पक्षाचे संस्थापक ह्यूम विदेशी होते. 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाला नवा ध्वज मिळाला, नवी ऊर्जा मिळाली. पण रातोरात काँग्रेसने तो ध्वजही हिसकून घेतला. 1920 पासून हा खेळ चालला आहे.

विरोधकांचे नामप्रेम आजचे नाही, अनेक दशकांपासूनचे आहे. त्यांना वाटते नाव बदलून देशावर राज्य करता येईल. गरिबाला चहूबाजूला त्यांचे नाव दिसते, पण त्यांचे काम कुठे दिसत नाही. रुग्णालयात नावे त्यांची आहेत, पण उपचार नाहीत. शिक्षण संस्था, रस्ते, उद्याने, योजना, क्रीडा पुरस्कार, विमानतळे, संग्रहालये यांना त्यांची नावे आहेत. पण त्या योजनांमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. समाजाच्या शेवटच्या स्तरावर उभा व्यक्ती काम होताना पाहू इच्छितो. पण त्याला फक्त या कुटुंबाचे नाव मिळाले.

"गेल्या तीन दिवसांपासून आमच्या विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांनी मनापासून डिक्शनरी खोलून जिवढे अपशब्द वापरता येतील तेवढ्या शब्दांचा प्रयोग केला. त्यांचं मन आता हलकं झालं असेल. ते मला दिवस-रात्र कोसत असतात. त्यांच्यासाठी मोदी तेरी कब्र खुदेगी, हा त्यांचा सर्वात प्रिय नारा आहे. पण माझ्यासाठी यांचे अपशब्द हे टॉनिक आहेत. ते असं का करतात, हे का होतं? आज मी सदनमध्ये काही सिक्रेट सांगणार आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा आपल्या संसदेतील भाषणात समाचार घेताना म्हटलं आहे, देशातील संस्थांचा विरोधक जेव्हा जेव्हा वाईट प्रचार करतात, त्या संस्थाविषयी वाईट बोलतात, तेव्हा त्या संस्था तेवढ्याच वेगाने वर येतात, प्रगतीकडे वाटचाल करतात. एलआयसीचं उदाहरण देताना नरेंद्र मोदी यांनी असंच म्हटलं आहे. एलआयसी आता बुडणार आहे, गरिबांच्या पैशांचं काय होईल असं म्हटलं आणि एलआयसीने उलट प्रगतीकडे वाटचाल केली. राष्ट्रीयकृत बँकांविषयी देखील असंच भाकित आणि गैरप्रचार करतात, तेव्हा त्या संस्था उलट आणखी वाढत गेल्या आणि देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा २ टक्क्यांनी वाढला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच तुम्ही यूपीएचे अंत्यविधी केले आहेत. शिष्टाचारानुसार मी तेव्हाच तुम्हाला सहानुभूती व्यक्त करायला हवी होती. पण उशीर झाला यात माझी चूक नाहीये. कारण तुम्ही स्वत:च एकीकडे यूपीएचे अंंत्यविधी करत होतात आणि दुसरीकडे जल्लोषही करत होते. जल्लोष कशाचा? उजाड भिंतींवर नवीन प्लास्टर लावण्याचा. तुम्ही जल्लोष करत होता खराब यंत्रावर नवीन पेंट लावण्याचा. मला आश्चर्य वाटत होतं की ही आघाडी घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात? मी विरोघकांना सांगेन की तुम्ही ज्यांच्या मागे चालत आहात, त्याला तर या देशाची भाषा, देशाच्या संस्कारांची समजच नाहीये. अनेक पिढ्यांपासून हे लोक लाल मिर्ची आणि हिरव्या मिर्चीमधला फरक समजू शकत नाहीयेत. वेश बदलून दगा करणाऱ्यांचं सत्य समोर येतंच. ज्यांना फक्त नावाचाच आधार आहे, त्यांच्यासाठी म्हटलं गेलं आहे.. दूर युद्ध से भागते, नाम रखा रणधीर, भाग्यचंद की आजतक सोयी है तकदीर

आम्ही भारताच्या तरुणांना घोटाळे नसणारे सरकार दिले आहे. भारताच्या तरुणांना खुल्या आकाशात भरारी घेण्याची संधी दिली आहे, प्रोत्साहन दिले आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली आहे. अजूनही काही लोक प्रयत्न करत आहेत की जगात आपल्या प्रतिमेवर डाग लागावा. पण जगाचा विश्वास वाढत चालला आहे.

1999 मध्ये वाजपेयी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता. शरद पवार यांनी त्यावेळी विरोधकांचे नेतृत्व करत केले. पण यावेळी विरोधी पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. खरंतर त्यांना पक्षाने बाजूला केले आहे. त्यामुळे त्यांना बोलायलाही वेळ दिला गेला नाही. काँग्रेस त्यांचा वारंवार अपमान करते. कधी निवडणुकीच्या नावावर त्याना अनिश्चित काळापर्यंत गटनेते पदावरून हटवतात. आमच्या संवेदना अधीररंजन चौधरींच्या बाजूने आहेत. कदाचित कोलकाता (ममता) वरून फोन आला असावा, त्यामुळे चौधरी त्यांचे म्हणणे मांडू शकले नाहीत, असा टोला पीएम मोदींनी लगावला.

काही विरोधी पक्षांच्या आचरणाने त्यांच्यासाठी पक्ष देशापेक्षा मोठा असल्याचे सिद्ध झाले आहे. तुम्हाला गरिबांच्या भूकेची चिंता नाही, तर सत्तेची भूक आहे. तुम्हाला तुमच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, देशातील तरुणांच्या भवितव्याशी तुम्हा कसले ही देणे घेणे नाही.

अविश्वास प्रस्तावावरही तुम्ही कसली चर्चा केली. तुमचे दरबारीही फार दु:खी आहेत. ही अवस्था आहे तुमची. फिल्डिंग विरोधकांनी लावली, पण चौकार-षटकार सत्ताधारी बाकांवरून लागले. विरोधी पक्ष अविश्वास ठरावावर नो बॉल करत पुढे चालत राहिला. इथून सेंच्युरी होत होती, तिथून नो बॉल होत होते.

काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हे दाखवून दिलंय की देशापेक्षा त्यांना पक्ष मोठा आहे. विरोधकांना देशापेक्षा स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता आहे.

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी कामकाजाच सहभाग घेतला असता तर चांगले झाले असते. गेल्या काही दिवसांत या सभागृहाने अनेक महत्त्वाची विधेयके पारित केली. त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक होती. पण राजकारण विरोधकांसाठी प्राधान्याची बाब होती. त्या विधेयकांमध्ये विरोधकांना रस नव्हता. देशाच्या जनतेने ज्यासाठी त्यांना इथे पाठवले आहे, त्या जनतेचाही विश्वासघात करण्यात आला.

गेल्या तीन दिवसांपासून अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. सगळ्यांचीच भूमिका माझ्यापर्यंत पोहोचली आहे. मी स्वत: काही भाषणं ऐकलीही आहेत. देशातील जनतेने वारंवार आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी देशातील जनतेचे आभार. देव खूप दयाळू आहे. तो एका किंवा दुसर्‍या मार्गाने इच्छा पूर्ण करतो. देवाने विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची सूचना केली हा मी देवाचा आशीर्वाद मानतो. 2018 मध्येही विरोधकांनी तसा प्रस्ताव आणला तो आमच्यावरचा देवाचा आशीर्वादच होता. पण विरोधकांचा हा प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, तर ती विरोधकांची फ्लोअर टेस्ट आहे. एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ आहे.

जुलै 2018 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता

जुलै 2018 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ केवळ 126 मते पडली, तर 325 खासदारांनी विरोधात मतदान केले होते. यावेळीही अविश्वास ठरावाचे भवितव्य आधीच ठरलेले आहे कारण संख्याबळ स्पष्टपणे भाजपच्या बाजूने आहे आणि विरोधी पक्षांचे कनिष्ठ सभागृहात 150 पेक्षा कमी सदस्य आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news