पूर्णा (परभणी) – पुढारी वृत्तसेवा : येथील रेल्वे क्वार्टरमधील घरात एका रेल्वे कर्मचाऱ्याचा निवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना तारीख ३० एप्रिल रोजी उघड झाली. दरम्यान, घटनास्थळी पूर्णा पोलिस ठाण्याचे सपोनि दर्शन शिंदे, पो उप निरीक्षक बाबासाहेब लोखंडे, पोलिस शिपाई नरेश शिंदे हे जाऊन त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवला.
या घटनेची अधिक माहिती अशी की, पूर्णा रेल्वे खात्यात नोकरीस असलेले रेल्वे कर्मचारी दिनेशकुमार पाल (वय ३८, रा. खंडवा, मध्यप्रदेश) हे नांदेड रेल्वे विभागांअंतर्गत सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन खात्यात खलाशी पदावर कामावर होते. ते पूर्णेच्या रेल्वे क्वार्टरमधील वस्तीत आर बी १/१३८ गल्लीतील १ क्रमांकाच्या खोलीत एकटेच राहून ड्युटी करीत होते. ते मागच्या दोन दिवसांपासून शेजाऱ्यास दिसले नाही. त्यांच्या खोलीचे दरवाजा उघडला असल्याचे पाहून जवळील लोकांना संशय आला. त्यांच्या खोलीत जाऊन जवळील लोकांनी पाहिले असता दिनेशकुमार पाल हे निवस्त्र अवस्थेत दिसून आले. त्यावरुन घटनेची घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. कर्मचाऱ्याचा मृत्यू हा दारुच्या नशेत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास पूर्णा पोलिस करत आहेत.