पंकज उधास
पंकज उधास

स्‍मरण : चाहतों का मौसम!

पंकजजी, तुम्ही लौकिक जगातून निघून गेला असलात, तरी तुमच्या शब्दांची, स्वरांची, गझलांची, गीतांची पेरणी आमच्या मनांवर झालेली आहे. तुम्ही सर्वसामान्यांचं गझलेशी नातं जोडून गेला आहात… हेच नातं त्यांना आयुष्यावर प्रेम करायला लावतं, माणूस बनवतंं!

मिले किसी से नजर, तो समझो गझल हुई।
रहे न अपनी खबर तो समझो गझल हुई।

जफर गोरखपुरी यांनी गझल म्हणजे काय, हे अतिशय सहज नि सुंदर शब्दांत सांगितलेले आहे. याच जफर गोरखपुरींची एक अजरामर रचना, जिनं रसिकांना अक्षरशः धुंद करून टाकलं ती म्हणजे, 'ऐ गमे जिंदगी कुछ तो दे मशवरा, एक तरफ उसका घर, एक तरफ मैकदा…'

गझल आणि गीत यांच्यातील साधा फरकही न कळणार्‍या वयात जेव्हा हे शब्द कानी पडले तेव्हाच खरं जगणं सुरू झालं, असं शब्दसुरांवर प्रेम करणार्‍या प्रत्येकालाच वाटतं. कारण, ते शब्दच तसे होते आणि ते शब्द ज्या स्वरांतून आमच्या मनात पोहोचले होते, त्यांनीच आम्हा रसिकांच्या जगण्यात रसरशीतपणा आणला. संवेदनांचे शिंपण केले आणि जगण्यातली उत्कटता अनुभवयास लावली, ते नाव म्हणजे पंकज उधास.

पंकज उधास यांची गझल वा गीत ऐकलं नाही, असा एकही रसिक भारतात नसावा. आपल्या अविट गोडीच्या आवाजातून त्यांनी रसिकांना केवळ क्षणभर मोहित केलं नाही, तर रसिकांच्या मनातील रसिकत्वाला अजरामर करून टाकलं. पंकज उधास म्हटल्यानंतर त्यांची प्रसन्न मुद्रा डोळ्यापुढे अवतरते आणि त्यांची रचना कानामध्ये रुंजी घालू लागते. एका मोठ्या व गर्भश्रीमंत अशा कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही आपले वडीलबंधू मनहर यांच्यापासून प्रेरणा घेत पंकजजींनी आपलं नातं शब्दस्वरांशी जोडलं, जोपासलं आणि शेवटपर्यंत निभावलंदेखील.

पंकज उधास हे नाव बहुतांश लोकांपर्यंत पोहोचलं ते 'नाम' या चित्रपटातील 'चिठ्ठी आयी हैं' या गाण्यामुळे. हा चित्रपट पाहण्यासाठी जाणारे प्रेक्षक हे गाणं सुरू झाल्यानंतर अक्षरशः ओक्साबोक्सी रडायचे. अजूनही, जेव्हा नि जिथे कुठे हे गाणं लागतं, तेव्हा ऐकणारा प्रत्येकजण कितीही नाही म्हटलं तरी हळवा होतोच. 'चांदी जैसा रंग हैं तेरा'ही गझलही एका चित्रपटात वापरण्यात आली होती; मात्र तो चित्रपट हीट झाला नाही. गझल मात्र प्रचंड गाजली. पंकजजींची एकही मैफल 'चांदी जैसा' ऐकवल्याशिवाय पूर्ण होतच नसे.

माझ्या आयुष्यात पंकज उधास हे त्यांच्या गझलांमुळे पोहोचले. त्यांच्या जुन्या अल्बममधील काही गाणी संकलित करून एक कॅसेट मोठ्या बंधुराजाने आणली होती. त्यातच सात-आठ रचना होत्या. बस्स, त्यांचीच इतकी पारायणं झाली की, तरुणाईच्या उंबरठ्यावर असताना ऐकलेल्या त्या प्रत्येक रचनेतील शब्द न् शब्द, पंकजजींच्या आवाजातून मनात घट्ट रुतून बसला आहे. 'एक तरफ उसका घर' ही कश्मकश तेव्हाच ऐकली होती आणि तेव्हाच 'गमे-जिंदगी'ची आयुष्यात प्रथमच ओळख झाली होती. 'चुमकर मतभरी आँखों से गुलाबी कागज' असा प्रेमळ पत्रसंवाद असो वा 'निकलो ना बेनकाब, जमाना खराब हैं' अथवा 'थोडी थोडी पिया करो'असा सल्ला वगैरे त्यांच्याच आवाजातून कानी पडला; मात्र तेव्हा दोन अशा रचना मी ऐकल्या त्या कायमच आवडत राहिल्या.

मनात घर करून राहिल्या. एक म्हणजे, 'आईये बारिशों का मौसम हैं…' नसीम अजमेरी यांची ही एक अत्यंत तरल, सहज नि सुंदर अशा रचना. सुरुवातीलाच 'जिद हर एक बातपे नहीं अच्छी, दोस्त की दोस्त मान लेते हैं..' म्हणत ही रचना सुरू होते आणि बारिशोंका मौसम तुमचा चाहतोंका मौसम होऊन जातो. 'उम्र हैं ख्वाँहिशोंका मौसम हैं, हर गली आशिकोंका मौसम हैं, आज फर्माईशों का मौसम हैं' असा हा सुरेल आपल्याला घडवून आणतो. सहजता आणि नजाकत यांचा मिलाफ पंकजजींच्या स्वरांतून घडतो आणि ही एक गझल एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचते. अशीच एक दुसरी रचना म्हणजे, 'आप जिनके करिब होते हैं, वो बडे खूशनसीब होते हैं…' काय एकेक शब्द आहेत!

'जब तबियत किसी पे आती हैं… मौत के दिन करिब होते' यातील तबियत हा शब्द उच्चारताना त्यांनी तिथे दिलेला किंचितसा भर जाणवला की, आपलीही 'तबियत' तपासून घ्यावीशी वाटते. तसेच 'जुल्म सहकर हे उफ् नही करते हैं, उनके दिल भी अजीब होते हैं…' इथं 'उफ' बाबतही असंच काहीसं घडतं. नूह नर्वी यांची ही रचना पंकजजींच्या आवाजातून अजरामर झाली आहे. प्रेमात पडलेल्या, पडावंसं वाटणार्‍या आणि पडून पल्याड गेलेल्यालाही ही गझल कायम साद घालते.

पंकजजींच्या अशा अनेक रचना त्यांच्यातील वेगळेपणामुळे रसिकांच्या मनात कोरल्या गेलेल्या आहेत. प्रेमात आकंठ बुडलेल्यांची जुबानी म्हणता येईल, अशीच एक कैसर जाफरी यांची एक गझल म्हणजे, 'दिवारों पे मिलकर रोना अच्छा लगता हैं…' ही गझल ऐकताना रसिकांच्या अंतःकरणाला इतका गहिरा स्पर्श करते की, त्यातून बाहेर पडत सावरायलाही त्याला वेळ द्यावा लागतो. ही गझल म्हणजे गायन नव्हे, तर आपल्याच मनानं आपल्याशी केलेला संवाद वाटावा अशा पद्धतीने पंकजजींनी आपल्या स्वरांतून तिला सजविले आहे. 'जिये तो जिये कैसे, बिन आपके'ही चित्रपटातील रचना आपल्या मनात गझल म्हणूनच अधिक गहिरा परिणाम साधते. व्याकुळता, आर्तता यांना हळुवार जोपासत पंकजजींचा प्रेमळ स्वर जणू आपल्या संवेदनांना हळूवार जोजवतो, असंच त्याचं वर्णन करावं लागेल.
'नायाब' या त्यांच्या जुन्या अल्बममधील मुमताज राशीद यांची एक रचना अजूनही मनात रुंजी घातलेय…

आज वही गीतों की रानी
आज वही हैं जाने गझल..
चलते चलते राहमें जिसका
साथ हुआ था पल दो पल!

गीतकार, गायक आणि रसिक अशा सर्वांचं गझलेशी असणारं नातं, त्यात वापरण्यात आलेल्या प्रतिमा या अतिशय उत्कटतेने इथे बिंबवल्या जातात. अगदी अखेरच्या कडव्यात असणारे हे शब्द तुम्हाला खिळवून ठेवतात.

दिल के कागज पर जो बरसा,
उसकी यादों का बादल…

या शब्दांत खूप काही सामावून जातं. एक अनामिक साद गीत अन् गझलांमधून जोवर प्रत्येकाच्या मनात ऐकली जाईल, तोवर आपल्यातील माणूसपण फुलविणारी आपली संवेदनाही जिवंत राहील, जिंदादिल राहील. पंकजजी, तुम्ही या लौकिक जगातून निघून गेला असलात, तरी तुमच्या शब्दांची, स्वरांची, गझलांची, गीतांची पेरणी आमच्या मनांवर झालेली आहे. आम्हाला समृद्धी लाभलेली आहे. तुम्ही सर्वसामान्यांचं गझलेशी नातं जोडून गेला आहात. हेच नातं त्यांना आयुष्यावर प्रेम करायला लावतं, माणूस बनवतं आणि एका अलौकिक जगात विहरायलाही शिकवतं.

logo
Pudhari News
pudhari.news