श्री विठ्ठलाची मुखदर्शन रांग एक किलोमीटर लांब

श्री विठ्ठलाची मुखदर्शन रांग एक किलोमीटर लांब

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाची मुख दर्शन रांग एक किलोमीटरपेक्षा लांब पोहोचली आहे. मुखदर्शन रांगेत सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे भाविकांतून तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.

आषाढी यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यांतून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक पंढरीनगरीत दाखल झाले आहेत. पंढरीत आलेले भाविक चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी यात्रेनिमित्त पंढरीनगरीत लाखो भाविक दाखल जालेले आहे. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 15 ते 20 तास लागत असल्यामुळे भाविक मुखदर्शन घेण्यात समाधान मानतात. श्री विठ्ठलाची मुखदर्शन रांग एक किलोमीटरपेक्षाही जास्त लांब पोहोचली आहे. सध्या श्री विठ्ठलाची मुख दर्शन रांग जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज भवनजवळील सुफला सेतूवरून डगरीवरील पाण्याचा हौद, उमदे गल्ली येथील मंजूळ घाट, छत्रपती संभाजी महाराज चौक, कालिकादेवी चौक येथून विजापूर गल्ली, हरिद्वार हॉटेलपासून विणे गल्लीपर्यंत पोहोचली आहे. येथून श्री विठ्ठलाचे मुख दर्शन घेण्यासाठी 3 ते 4 तासांचा अवधी लागत आहे.

दरम्यान, मुखदर्शन रांगेस छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंतच बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तेथून पुढे रस्त्यावरच दर्शन रांग उभी करण्यात आली आहे. बॅरिकेडिंग नसल्यामुळे मुखदर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे. यामुळे भाविकांत वादावादी होत आहे. बॅरिकेडिंग व छत नसल्यामुळे भाविकांना उन्हामध्ये उभे राहावे लागत आहे.

मुखदर्शन रांगेसही बॅरिकेडिंगची मागणी

श्री विठ्ठलाच्या पददर्शन रांगेप्रमाणे मुखदर्शन रांगेस पूर्ण बॅरिकेडिंग व छत टाकण्यात यावे. जेणेकरून भाविकांना उन्हाचा व पावसाचा त्रास सहन करावा लागणार नाही. बॅरिकेडिंग केल्यास घुसखोरीलाही आळा बसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news