पंढरपूर : आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना करता येणार सेवा

पंढरपूर : आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना करता येणार सेवा
Published on
Updated on

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोफत सेवा देण्याची इच्छा असणार्‍या भाविकांकडून सेवा करून घेण्याबाबत मंदिर समिती उत्सुक आहे. त्या द़ृष्टीने मंदिर समितीकडून नियम, अटी, शर्ती व मंदिराची सुरक्षा लक्षात घेता प्रायोगिक तत्त्वावर भाविकांना सेवा करण्याची संधी देण्याचा विचार केला जात आहे.

भाविकांना मोफत सेवा देण्याची संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत असल्याने वारकरी सांप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही मोफत देवाची सेवा करण्यास इच्छुक असल्याच्या भावना भाविकांमधून व्यक्त होत आहेत. विठ्ठल मंदिरात मोफत सेवा बजावू देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांकडून केली जात होती. या मागणीचा मंदिर व्यवस्थापन विचार करीत असल्याने भाविकांमधून देव पावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याविषयी अद्याप निर्णय झालेला नसल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले.

सध्या विठ्ठल मंदिरात 272 कर्मचारी आणि शेकडो हंगामी कर्मचार्‍यांच्या मदतीने विठ्ठल मंदिर प्रशासन सेवा देत असते. यामुळे मंदिर समितीचे लाखो रुपये खर्ची पडत आहेत. एका बाजूला सेवाभावी वृत्तीने हजारो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीची मोफत सेवा देण्यास तयार आहेत. असे असताना भाविकांच्या पैशाची उधळपट्टी का, असा सवालही उपस्थित होत आहे. आता मंदिर प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर मोफत विठ्ठल सेवेचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यास कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, मोफत सेवा बजावण्यास महिलावर्ग देखील उत्सुक आहे. मंदिर समितीने शासनाच्या मदतीने मोफत सेवा पद्धतीची सेवा सुरू केल्यास विठ्ठल मंदिर खर्‍या अर्थाने विठ्ठल भक्तांच्या ताब्यात येणार आहे. विठ्ठल मंदिर, दर्शन व्यवस्था, अन्न छत्र, परिवार देवता अशा ठिकाणी भाविकांची मोफत सेवा वापरता येणार आहे.

राज्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज, गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज तसेच इतर अनेक देवस्थानात भाविकांकडून विनामूल्य सेवा देण्याची व्यवस्था कार्यरत आहे. मोफत सेवा देणार्‍यांमध्ये अधिकारी, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य भाविक मोफत सेवा देत असतात. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील वारकर्‍यांच्याप्रती सेवा भाव दाखवत अशी सेवा देण्याबाबत भाविकांकडून मागणी होत होती. अशा पद्धतीची सेवा करण्याची संधी मिळाल्यास राज्यभरातील अनेक गावे, विविध धार्मिक संस्थांकडूनही मोफत सेवा देण्याची तयारी दाखवण्यात येत आहे.

विठ्ठल मंदिरात 365 दिवस 24 तास सेवा द्याव्या लागतात. यासाठी मोफत सेवा देऊ इच्छिणार्‍या भाविकांकडून माहिती मागवण्यात येणार आहे. त्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय, हे पाहिले जाणार आहे. त्या द़ृष्टीने मंदिर समिती मोफत सेवेबाबत अटी, शर्ती, मंदिराची सुरक्षितता, सेवेचा कालावधी ठरवून देत सेवा घेण्याबाबत प्रयत्नशील आहे.
– तुषार ठोंबरे, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news