पंचगंगा प्रदूषणमुक्ती मिशन दोन वर्षांत पूर्ण : पालकमंत्री दीपक केसरकर

पंचगंगा प्रदूषणमुक्ती मिशन दोन वर्षांत पूर्ण : पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा प्रदूषणमुक्ती हे सरकारचे मिशन आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली असून दोन वर्षांत हे मिशन तडीस नेण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भरघोस निधी देऊ, असेही ते म्हणाले.

दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या केसरकर यांनी पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत रंकाळा तलाव, शालिनी पॅलेस परिसराची पाहणी केली. यानंतर पर्यटन विकासाच्या द़ृष्टीने कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. नदी प्रदूषण मुक्तीची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यानुसार पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. येत्या दोन वर्षांत तो तडीस नेण्याचा प्रयत्न असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

राज्य चांगले असले की रामराज्य म्हटले जाते. महाराष्ट्र राज्य चांगले राहावे यासाठी अयोध्येला जात आहोत. चांगले काम करताना श्रीरामाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात, असे सांगत केसरकर म्हणाले, जसे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश भवन बांधले, त्याच प्रकारे उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन व्हावे हा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. याकरिता दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांत बैठक होणार आहे.

शरद पवार यांच्या हट्टापोटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून जे काही प्रयत्न करायचे होते ते आम्ही केले. नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिसाद दिला होता, असे सांगत शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे उद्धव ठाकरे यांनी ठरवले होते. मात्र, शरद पवारांचा हट्ट होता, म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले. ठाकरेंच्या मनातीलच मुख्यमंत्री सध्या राज्यात आहे. त्यामुळे त्यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.

शिवसेनेला मार्केटिंगची गरज नाही. आम्ही लोकांसाठी काम करतो, असे सांगत केसरकर म्हणाले, मार्केटिंगची गरज आदित्यसारख्या लोकांना असते, अडीच वर्षे मंत्री राहून त्यांनी काय केले? मुंबईची सर्वाधिक प्रदूषित हवा, ही त्यांनी दिलेली देणगी आहे. त्यांच्याकडे मोठमोठे सल्लागार असतात. खोटे कसे बोलायचे, लोकांची बदनामी कशी करायची, याचे त्यांना चांगले ट्रेनिंग दिले आहे, ते त्यांना लखलाभ होवो, असेही केसरकर म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news