पुढारी ऑनलाईन डेस्क : Sehar Shinwari : टी 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सेमी फायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी द. आफ्रिकेविरुद्ध करो या मरोचा सामना खेळत आहे. पाकिस्तानचा संघ जिंकला तरच तो स्पर्धेत टिकू शकेल, हरल्यास संघाचा प्रवास इथेच संपणार आहे. टीम इंडिया ग्रुप-2 च्या पॉईंट टेबलमध्ये 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताचा अजून एक सामना बाकी आहे. 6 नोव्हेंबरला टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यात तुल्यबळ झिम्बाब्वेला मात देणे टीम इंडियासाठी काही अवघड बाब नाही. पण तरीही प्रतिस्पर्धी संघाला हलक्यात घेण्याची चूक रोहित ब्रिगेड घेणार नाही आणि या सामन्यात चांगली कामगिरी करेल असा विश्वास चाहत्यांसह क्रिकेट तज्ज्ञांना आहे. मात्र, भारत-झिम्बाब्वे सामन्यापूर्वी एका पाकिस्तानी अभिनेत्रीने अजब विधान करून सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. एक ट्विट करून तिने एकप्रकारे भारतीय चाहते आणि खेळाडूंना चॅलेंजच दिले आहे.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताने त्यांना अटीतटीच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली. त्यानंतर त्यांना दुसऱ्या सामन्यात मोठ्या अपसेटला सामोरे जावे लागले. झिम्बाब्वेने एका निकराच्या सामन्यात पाकिस्तानवर एका धावेने मात करत रोमहर्षक विजय मिळवला. अखेर नेदरलँडविरुद्धचा सामना जिंकून त्यांनी स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. त्यानंतर चौथा सामना दिग्गज द. आफ्रिकेविरुद्ध खेळला. हा सामना त्यांना जिंकावाच लागणार आहे. कारण सलग दोन पराभवामुळे त्यांचे गुणतालिकेत मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ग्रुप 2 मधील पुढच्या तीन सामन्यांच्या निकालावरही पाकचे नशीब अवलंबून आहे. त्यातला एक भारत विरुद्ध झिम्वाब्वे हा सामना आहे. याच सामन्यावरून पाकिस्तानची अभिनेत्री सहर शिनवारी (Sehar Shinwari) हिने खळबळजनक ट्विट केले आहे.
सहर शिनवारीने (Sehar Shinwari) ट्विट म्हटलं की, 'पुढील सामन्यात झिम्बाब्वे संघाने भारताला चमत्कारिकरित्या हरवले तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन.'
अभिनेत्री शिनवारी झिम्बाब्वेच्या विजयासाठी प्रार्थना करता आहे. पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी तिला भारताचा पराभव पाहायचा आहे. बुधवारी सुद्धा भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान या अभिनेत्रीने टीम इंडियाच्या पराभवासाठी प्रार्थना केली होती. पण शेवटी भारताचाच विजय झाला ही गोष्ट वेगळी. शिनवारीचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, 'तुम्हाला तुमचे आयुष्य असेच एकटे व्यतीत करावे लागणार आहे.'