PAK vs SL : पाकचा श्रीलंकेला क्लीन स्विप

PAK vs SL : पाकचा श्रीलंकेला क्लीन स्विप

कोलंबो, वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट संघाने (PAK vs SL) श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने मालिकेत 2-0 असा क्लीन स्विप केला. दुसर्‍या कसोटी सामन्यात श्रीलंकेची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यांना 200 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नुमान अलीसमोर श्रीलंकेचा संघ दुसर्‍या डावात पूर्णपणे असहाय्य दिसला. नुमानने दुसर्‍या डावात एकहाती 7 विकेटस् घेतल्या, तर तीन विकेटस् नसीम शाहने टिपल्या. त्यामुळे लंकेचा संघ 188 धावांत तंबूत परतला. पाकिस्तानने या विजयासह विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यातील अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे.

कोलंबो येथे पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा पहिला डाव 166 धावांत गारद झाला. श्रीलंकेसाठी पहिल्या डावात धनंजया डी सिल्वाने सर्वाधिक 57 धावा केल्या. दुसरीकडे, गोलंदाजीत पाकिस्तानकडून अबरार अहमदने 4 बळी घेतले, तर नसीमच्या खात्यात तीन बळी होते.

पाकिस्तानने प्रत्युत्तरात अब्दुला शफीक (201) आणि आगा सलमानच्या (132) दमदार खेळीच्या जोरावर 5 बाद 578 धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानी संघाला पहिल्या डावात 410 धावांची आघाडी मिळाली होती, पण लंकेचा दुसरा डाव 188 धावांवर आटोपला आणि पाकिस्तानने सामना एक डाव आणि 222 धावांनी जिंकला.

अव्वल स्थान अधिक बळकट (PAK vs SL)

भारताला विंडिज विरुद्ध 2-0 ने जिंकण्याची संधी होती, पण दुसर्‍या कसोटीत पावसाच्या हजेरीमुळे पाचव्या दिवशी सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारताला विंडीजवर 1-0 असा विजय मिळवता आला. पाकिस्तानला मात्र श्रीलंकेविरूद्ध दोन्ही कसोटी जिंकता आल्याने मोठा फायदा झाला. श्रीलंकेने दुसरा सामना अनिर्णीत राखला असता, तर पाकिस्तानला मोठ्या फरकाने अव्वल स्थान मिळाले नसते. पाकिस्तानच्या संघाने दोन कसोटी जिंकून 24 गुणांसह आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले, तर भारताला 1 विजय आणि 1 अनिर्णीत सामन्यामुळे 16 गुणांवरच समाधान मानावे लागले आहे. अशा परिस्थितीत भारत सध्या दुसर्‍या स्थानी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news