Pakistan Political Crisis : पाकच्या राजकारणात गेल्या महिनाभरात काय-काय घडले?

Pakistan Political Crisis : पाकच्या राजकारणात गेल्या महिनाभरात काय-काय घडले?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan Political Crisis : पाकिस्तान आज पुन्हा 'जूना' होईल. 'नव्या पाकिस्तान'चे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले इम्रान खान आता माजी पंतप्रधान झाले आहेत आणि 'जुन्या पाकिस्तान'चा पुरस्कार करणारे सत्तेवर आले आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे शाहबाज शरीफ आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. कालपर्यंत शाहबाज हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षनेते होते, मात्र आजपासून त्यांना 'वझीर-ए-आझम' म्हटले जाईल.

2018 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांनी 'नवा पाकिस्तान' बनवण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून या नवा पाकिस्तान विरुद्ध जुना पाकिस्तानची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. रविवारी अविश्वास प्रस्तावामुळे इम्रान सरकार पडले, त्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) नेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, 'जुन्या पाकिस्तानात आपले स्वागत आहे.' (Pakistan Political Crisis)

असो, इम्रान खान यांचे पाकिस्तानच्या सत्तेतून बाहेर पडणे आणि शाहबाज शरीफ यांचे आगमन हे एखाद्या नाटकापेक्षा कमी नव्हते. गेल्या महिनाभर पाकिस्तानचे राजकीय नाट्य संपूर्ण जगाने पाहिले. मात्र, इम्रान यांना सत्तेवरून बेदखल करण्याची तयारी खूप आधीपासून सुरू झाली होती. (Pakistan Political Crisis)

वृत्तानुसार, 5 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP)चे नेते बिलावल भुट्टो झरदारी आणि त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N)चे अध्यक्ष शाहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ यांची भेट घेतली. त्या बैठकीत तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) आणि जमियत उलेमा-ए-फझल (जेयूआय-एफ)चे प्रमुख मौलाना फजल-उर-रहमान यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनाही सोबत घेतले. (Pakistan Political Crisis)

पाकिस्तानच्या राजकारणात महिनाभरात काय घडले? (Pakistan Political Crisis)

8 मार्च : विरोधकांनी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. या अविश्वास प्रस्तावाला माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन, बिलावल भुट्टो यांचा पक्ष पीपीपी आणि मौलाना फजलुर रहमान यांचा पक्ष जेयूआय-एफ यांनी पाठिंबा दिला.

27 मार्च : इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये एका मोठ्या सभेला संबोधित केले. या रॅलीत इम्रान यांनी आपल्याविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावामागे 'परकीय षडयंत्र' असल्याचा दावा करणारे पत्र दाखवले.

31 मार्च : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास ठरावावर चर्चा होणार होती, मात्र कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले.

3 एप्रिल : अविश्वास ठरावावर मतदान होणार होते. मतदानापूर्वीच उपसभापती कासिम सूरी यांनी ते फेटाळून लावले. यानंतर इम्रान खान यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी नॅशनल असेंब्ली बरखास्त केली. या संपूर्ण राजकीय संकटाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली.

7 एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. न्यायालयाने उपसभापतींचा निर्णय 'असंवैधानिक' असल्याचे म्हटले. तसेच पंतप्रधानांच्या शिफारशीवरून सभागृह बरखास्त करण्याचा राष्ट्रपतींचा निर्णयही असंवैधानिक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि न्यायालयाने 9 एप्रिल रोजी अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले.

9 एप्रिल : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संसदेचे कामकाज पार पडले. त्या दिवशीही बरेच राजकीय नाट्य घडले. अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वीच सभागृहाचे अध्यक्ष असद कैसर यांनी राजीनामा दिला. रात्री उशिरा अविश्वास ठरावावर मतदान झाले, त्यात 174 मते पडली आणि इम्रान यांचे सरकार पडले.

11 एप्रिल : इम्रान सरकार पडल्यानंतर नव्या पंतप्रधानाच्या निवडीसाठी संसदेचं कामकाज सुरू झालं. इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या सर्व खासदारांनी राजीनामा देऊन पंतप्रधानपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. पण अखेर नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांची पाकिस्ताच्या नूतन पंतप्रधानपदी निवड झाली.

आता पुढे काय होणार?

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या समर्थनार्थ 174 मते पडली. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ 11 एप्रिलच्या रात्री 8 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाच्या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, रविवारी पीएमएल-एन आणि पीपीपीच्या नेत्यांची बैठक झाली. ज्यामध्ये पीटीआयच्या खासदारांनी राजीनामा दिल्यास त्यातून रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news