ODI World Cup : वर्ल्डकपचे सामने भारताबाहेर खेळू

ODI World Cup : वर्ल्डकपचे सामने भारताबाहेर खेळू
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आशिया चषकातील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळण्यास भारताने अनुकूलता दर्शवली असल्याचे सांगितले जाते. यावरून पाकिस्तानही जशास तसे वागण्याचा प्रयत्न करीत असून आपणही वर्ल्डकपचे सामने भारताबाहेर खेळू, असे पीसीबीचे म्हणणे आहे.

आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात वाद सुरू आहे. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक 2023 ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यावर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमिझ राजा यांनी भारतात होणार्‍या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) विश्वचषकासाठी आम्ही भारतात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतात होणार्‍या वन डे विश्वचषकाचे सामने श्रीलंका किंवा बांगला देशात खेळायचे आहेत. याच वृत्ताला दुजारा देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. होय, आम्हीही याचाच विचार करत आहोत. जर बीसीसीआयने आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवला नाहीतर भारतात होणार्‍या विश्वचषकातील आमचे सामने बांगला देश किंवा श्रीलंकेत व्हायला हवेत. कारण आम्हाला भारतात सामने खेळायचे नाही, अशा शब्दांत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला लक्ष्य केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले, भारत पाकिस्तानात खेळला नाही तर आम्हीदेखील भारतात खेळणार नाही. भारत-पाकिस्तान यांचे सामने कुठे व्हावेत याबाबत मार्ग काढायला हवा. पाकिस्तान सुपर लीगमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मजबूत झाले आहे. आम्ही आमच्या पायावर उभे राहिले असून भारतीय संघ पाकिस्तानात नाही आला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. तसेच भारत पाकिस्तानात न आल्याने आमचे नुकसान होईल, पण याचा काहीही फरक पडणार नाही.

आयसीसी अधिकार्‍याचे मोठे विधान

काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे महाव्यवस्थापक वसीम खान यांनी मोठे विधान केले आहे. मला माहीत नाही की भारतात होणार्‍या वन डे विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने इतर तटस्थ ठिकाणी खेळवले जातील की नाही; परंतु मला वाटत नाही की, पाकिस्तान त्यांचे सामने भारतात खेळेल. मला वाटते की त्यांचे सामने देखील भारताच्या आशिया कप सामन्यांप्रमाणेच तटस्थ ठिकाणी आयोजित करावे लागतील, असे आयसीसी अधिकारी वसीम खान यांनी एआरवाय न्यूजला सांगितले.

बीसीसीआय ठाम

विश्वकरंडक स्पर्धा ही आयसीसीची स्पर्धा असून तिची घोषणा आयसीसीकडून जाहीर करण्यात येत असते आणि यंदाच्या एकदिवसीय स्पर्धेचे भारतच यजमान आहे. पाकने कितीही म्हटले तरी ते इतर देशात त्यांचे सामने खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news