PAKvsNZ T20WC : पाकिस्तानचा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

PAKvsNZ T20WC : पाकिस्तानचा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहम्मद रिझवान (57) आणि बाबर आझम (53) यांच्या अर्धशकांच्या जोरावर पाकिस्तानने टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 7 विकेट राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली आहे. फायनलमध्ये आता त्यांचा सामना भारत विरुद्ध इंग्लंड या दुस-या सेमी फायनलमधील विजेत्या संघाशी होईल. 13 नोव्हेंबर हा सामना रंगणार आहे.

न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 20 षटकांमध्ये चार बाद 152 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी डॅरिल मिशेलने 35 चेंडूत नाबाद 53 आणि कर्णधार केन विल्यमसनने 42 चेंडूत 46 धावा करत धावसंख्या 150 च्या पुढे नेली. प्रत्युत्तरात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी 75 चेंडूत 105 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. बाबर आझमने 53 आणि मोहम्मद रिझवानने 57 धावा केल्या. पाकिस्तानने 5 चेंडू बाकी ठेवत आणि 3 विकेट गमावून 153 धावा करून सामना जिंकला.

153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानला जबरदस्त सुरुवात करून दिली. सुपर-12 च्या चार सामन्यांमध्ये ही जोडी फ्लॉप ठरली होती, परंतु बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात बाबर आणि रिझवान यांनी अर्धशतकी भागीदारी केली होती, जी या दोघांनी उपांत्य फेरीतही कायम ठेवली. आज उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दोघांनी शतकी भागिदारी रचून संघाचा विजय निश्चित केला.

पाकिस्तानची आक्रमक सुरुवात

153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने वेगवान सुरुवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची सलामी दिली. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकले. मोहम्मद रिझवानने डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाला चांगली सुरुवात करून दिली. याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडचा यष्टिरक्षक कॉनव्हेने एक झेल सोडत बाबर आझमला जीवनदान दिले. पहिल्या षटकाच्या अखेरीस पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद सात धावा होती. यानंतरचे साऊदीचे दुसरे षटक खेळून काढले. या षटकात त्यांना दोनच धावा काढता आल्या. मात्र. तिस-या षटकात रिझवान-बाबर जोडी आक्रमक झाली. बोल्टच्या या षटकात तीन चौकार फटकावून 15 धावा वसूल करण्यात आल्या. यानंतर चौथ्या षटकात 8 धावा घेतल्या. पण पुन्हा पाचव्या षटकात बोल्टच्या वेगाविरुद्ध रिझवान-बाबरने आक्रमण केले आणि या षटकात 15 धावा चोपल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात एका चौकाराच्या सहाय्याने 8 धावा मिळवण्यात या जोडीला यश आले. 6 षटकांअखेर पाकिस्ताने 9.17 च्या रन रेटने बिनबाद 55 धावा फटकावल्या. पॉवर प्ले नंतर धावा काढण्याची काढण्याची गती थोडी कमी झाली. 10 षटकांअखेर 8.7 रन रेटने बिनबाद 87 धावांपर्यंत मजल मारली. 11 वे षटक पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठी चांगले गेले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढून बाबरने 50 धावा पूर्ण केल्या. या स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. 12 व्या षटकात बाबर-रिझवान जोडीने संघाची धावसंख्या 100 च्या पार नेली. टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील त्यांची ही तिसरी 100+ भागीदारी ठरली. 105 धावांवर पाकिस्तानची पहिली विकेट पडली. बाबर आझम 53 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर डॅरेल मिचेलने त्याचा झेल घेतला. बाद होण्यापूर्वी बाबरने शानदार खेळी करत आपले काम चोख बजावले. त्याने रिझवानच्या जोडीने पाकिस्तानला मजबूत स्थितीत पोहचवले. यानंतर 13.4 व्या षटकात रिझवानने अर्धशतकाला गवसणी घालत 36 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. संघाला 19 चेंडूत 21 धावांची गरज असताना मोहम्मद रिझवान झेलबाद झाला. बोल्टने त्याची विकेट घेतली. यावेळी पाकिस्तानची धावसंख्या 132 होती. मोहम्मद रिझवानने 43 चेंडूत 57 धावा केल्या.

न्यूझीलंडची खराब सुरुवात

टॉस जिंकून पहिला फलंदाजी करताना किवी संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्या षटकाच्या तिस-या चेंडूवर सलामीवीर फिन एलनला शाहीन आफ्रिदीने माघारी धाडले. ह न्यूझीलंडला पहिला धक्का ओता. एलनने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. यानंतर तो दुसऱ्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होण्यापासून थोडक्यात बचावला. तो चेंडू बॅटला लागून पॅडवर आदळला होता. पण तिसऱ्या चेंडूवर एलन वाचू शकला नाही. तो पुढे येत चेंडू फाटकावण्याचा प्रयत्नात होता, पण तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याने तीन चेंडूत चार धावा केल्या.

यानंतर सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात डेव्हॉन कॉनवे धावबाद झाला. त्याला शादाब खानने सरळ थ्रोवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॉनवेने 20 चेंडूत 21 धावा केल्या. न्यूझीलंडने सहा षटकांत दोन गडी गमावून 38 धावा केल्या. आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. मोहम्मद नवाजच्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह मारायला गेलेला ग्लेन फिलिप्स कॉट अँड बोल्ड झाला. फिलिप्सने आठ चेंडूंत सहा धावा केल्या. यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या आठ षटकांत तीन बाद 49 होती.

न्यूझीलंडच्या तीन विकेट्स 49 धावांवर पडल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी संघाचा डाव सावरला. 10 षटकांअखेर न्यूझीलंड 3 विकेट गमावून 59 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. पण विल्यमसन आणि मिशेल यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी केली. दोघांनी फटकेबाजी टाळून एकेरी दुहेरी धावांवर जोर देत धावफलक हलता ठेवला. अर्धशतकी भागिदारी होईपर्यंत त्यांनी 9 व्या षटकापासून ते 14 व्या षटकांपर्यंत 3 चौकार आणि दोन षटकार मारले होते.

16.2 व्या षटकात न्यूझीलंडला चौथा धक्का बसला. संघाचा डाव सांभाळलेला केन विल्यमसन बाद झाला. शाहीन आफ्रिदीने त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्याने 42 चेंडूत 46 धावांची संयमी खेळी केली. त्याने प्रत्येकी एक-एक चौकार षटकार फटकावला. विल्यमसनने जरी धिम्या गतीने फलंदाजी केली असली तरी त्याच्या या खेळीमुळे संघाला आधार मिळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार बाद झाल्यानंतर मिशेलने एकाबाजूने संयमी फलंदाजी केली. त्याने झुंझार अर्धशतक फटकावून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड :
केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), फिन ऍलन, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

पाकिस्तान :
बाबर आझम (कर्णधार) मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news