पैठण; पुढारी वृत्तसेवा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पैठण येथील महसूल विभागाच्या वाळू विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले असताना देखील काल (सोमवार) पोलीस संरक्षण सोबत न घेता अवैध वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तलाठी, कोतवाल यांना वाळू तस्करांनी लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली. यासंदर्भात चार वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज (मंगळवार) सकाळी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री रहाटगाव आपेगाव ते सोलनापूर रोडवर गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू तस्करी करताना विनाक्रमांकाचे वाहन वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पैठण महसूल विभागाचे वाळू विरोधी पथकातील बालानगर सजाचे तलाठी रमेश पाराजी फटांगडे व कोतवाल रवींद्र रंगनाथ सोनटक्के यांनी सोमवारी रात्री १०:३० ते ११ वाजण्याच्या सुमारास खासगी वाहनातून गेले. पोलीस संरक्षण सोबत न घेता अवैध वाळू रोखण्याची कारवाई करण्यासाठी सोलानपूर रोडवर सदरील वाहन थांबवले. वाळू परवाना नसल्यामुळे सदरील वाहन जप्त करून तहसील कार्यालयात घेऊन येत होते. यावेळी सदरील वाहन चालक, मालक यांनी तलाठी रमेश फटांगडे व रवींद्र सोनटक्के कोतवाल यांना लाकडी दांडक्याने जबरी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेची माहिती तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीलदार गिरजाशंकर आवळे यांना दिली असता, त्यांनी मध्यरात्री पैठण पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पैठण पोलीस ठाण्यात तलाठी रमेश फटांगडे यांच्या फिर्यादीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, पोना गोपाल पाटील यांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आज (मंगळवार) सकाळी चारपैकी वाहन मालक प्रतीक भोज, चालक शैलेश मानमोडे या दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. दरम्यान शासकीय वाहनाचा व पोलीस संरक्षणाचा वापर न करता तलाठी, कोतवाल महसूल कर्मचारी अवैध वाळू रोखण्याची कारवाई रात्रीच्या वेळेस गुपचूप करण्यात येत असल्यामुळे या पथकाच्या कारवाईबद्दल महसूल विभाग व नागरिकांत संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :