बेळगाव : मराठीतून उमेदवारी अर्ज, माहिती द्या : नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी | पुढारी

बेळगाव : मराठीतून उमेदवारी अर्ज, माहिती द्या : नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांत विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेसाठी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या तरतुदीनुसार आणि मराठी माणसांच्या हक्कांनुसार निवडणुकीचे उमेदवारी अर्ज आणि इतर माहिती मराठीतून देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी सोमवारी (दि. 27) जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे केली.

सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून सरकारी माहिती मिळणे हा अधिकार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज, निवडणुकीसंदर्भातील जाहिराती आणि इतर माहिती मराठीतूनही उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने कन्नडबरोबरच मराठीतूनही सर्व माहिती देण्यात यावी. सीमाभागात 15 टक्क्यांहून अधिक लोक मराठी आहेत. त्यांना मतदान करण्याचा आणि निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क आहे. त्यामुळे मराठी जनतेला मराठीतून निवडणुकीसंदर्भातील सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने याआधी म्हणजेच 2004 मध्ये बेळगाव, खानापूरसह सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. याशिवाय उच्च न्यायालयानेही मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भात आदेश दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज, जाहिराती आणि इतर कागदपत्रे मराठीतून देण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.

Back to top button