Padma Awards : पद्मश्री पुरस्कार माझ्या रुग्णांना समर्पित ; डॉ. मनोहर डोळे यांच्या भावना

Padma Awards : पद्मश्री पुरस्कार माझ्या रुग्णांना समर्पित ; डॉ. मनोहर डोळे यांच्या भावना

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मी जरी डोळ्याचा डॉक्टर नसलो तरी ग्रामीण भागातील अनेकांना दृष्टी देऊ शकलो याचा मला प्रचंड आनंद आहे. केंद्र सरकारने मला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला मिळालेला पुरस्कार ज्या रुग्णांची मी सेवा केली त्यांना मी समर्पित करतो अशा भावना डॉ.मनोहर डोळे यांनी दै. 'पुढारी' प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नारायणगाव परिसरामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात येतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली.

डॉ. मनोहर डोळे यांचे ग्रामीण भागामध्ये मोठे कार्य असून डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे मोहन ठुसे नेत्र रुग्णालय व संशोधन संस्था नारायणगाव या ठिकाणी केले अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवा सुरू आहे. डॉ. मनोहर डोळे यांना आजवर विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 1954 मध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून डी ए एस एफ ही पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नारायणगाव या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला. पन्नास वर्षांपूर्वी त्याकाळी नारायणगाव मध्ये प्राथमिक नागरी सुविधा, वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आधी उपलब्ध नव्हते परंतु तरीदेखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सेवाभावी वृत्तीने डॉक्टरांनी येथे राहण्याचा निश्चय करून गोरगरीब जनतेच्या सेवेला सुरुवात केली.

गेल्या 40 वर्षात हजारो नेत्र रुग्णांची चिकित्सा मोफत नेत्र शस्त्रक्रिया तसेच दुर्गम भागात आयोजित केलेल्या अनेक नेत्र शिबिरामुळे शंभर किलोमीटर परिसरातील ग्रामीण भागात हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. आजवर एक लाख 75 हजार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. दर महिन्याला साडेचारशे ते पाचशे नेत्र शस्त्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात अनेक नेत्र शिबिरातून आजपर्यंत अडीच लाख लोकांपेक्षा अधिक रुग्णांना उपचाराचा लाभ या ठिकाणी मिळाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news