धक्कादायक ! सिव्हिलमध्ये ऑक्सिजन पाईपलाईन लिकेज ; रुग्णाचा मृत्यू

धक्कादायक ! सिव्हिलमध्ये ऑक्सिजन पाईपलाईन लिकेज ; रुग्णाचा मृत्यू
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : सोमवारी रात्री साडेनऊ वाजलेले.. महिला रुग्णाचा रक्तदाब अचानक कमी होताच नर्सनी तातडीने सलाईन जोडले.. मात्र त्याची टॅप बसत नसल्याने रक्त थांबेना.. दुसरी टॅप शोधून रक्त थांबवलं, मात्र हातावरच्या सलाईनला पट्टीच चिकटेना… सेवेतील डॉक्टरही गायब… ऑक्सिजन संचही जवळ नाही.. अखेर दुसर्‍या ठिकाणाहून तो उपलब्ध केला खरा, मात्र तो बसविताच येईना.. रुग्णकक्षातील फिटींग केलेल्या पाईपलाईनमधून ऑक्सिजन जोडला तर त्याची भिंतीवरील फिटींगही लिक… नातेवाईकांनीच चिकटपट्टी लावत लिकेजवर उपाय शोधला. धावाधावीनंतर कुठे डॉक्टर पोहचले. मात्र यात बराच वेळ गेला अन् तिकडे 'त्या' रुग्णानेही जगाचा निरोप घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणामुळेच 'तिचा' बळी गेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातील उपचारांमुळे अनेकांचा जीव वाचला असला तरी केवळ काही कर्मचारी, अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे आजपर्यंत अनेक रुग्णांचा जीव गेल्याच्याही तक्रारी आहेत. रविवारी एक महिला रुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. उपचारही सुरू केले गेले. दुसर्‍या दिवशी सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास 'तिने' नातेवाईकांसमवेत जेवण घेतले. मात्र त्यानंतर अचानक त्रास सुरू झाला. नर्स तातडीने मदतीला धावली. नव्याने दुसर्‍या हातालाही सलाईन जोडले.

श्वासनाचा त्रास जाणवू लागल्याने नर्सनी धावपळ केली. मात्र एकही डॉक्टर महिला सर्जिकल कक्षात नव्हते. डॉक्टरांना बोलविण्यासाठी नर्स अपघात कक्षात पोहचली. डॉक्टरांना घेवूनच ती आली. तोपर्यंत काही नर्सनी शेजारील विभागातून ऑक्सीजन संच ढकलत आणला. तो रुग्णाला जोडणेही शक्य होईना. कक्षातील पाईपद्वारे उपलब्ध ऑक्सीजन रुग्णाला जोडला. मात्र तो चालू करताच भिंतीवर ऑक्सिजन पाईप लिकेज असल्याचे निदर्शनास आले. चिकटपट्टीने लिकेज थांबविले. मात्र तोपर्यंत रुग्ण महिलेने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

सिव्हिलमध्ये दुसर्‍या घटनेतूनही राडा?
रात्री 11 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दोन गटात हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याला दुजोरा मिळला नसला तरी उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्याने जबाबदार काही कर्मचार्‍यांना नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आल्याचे समजले. मारहाणीची घटना खरी असून कर्मचार्‍यांना नव्हे तर आपसातच झाल्याचा दावा सिव्हिल प्रशासनाने केला आहे.

… तर ती वाचली असती का?
दरम्यान, वेळेत ऑक्सिजन मिळाला असता तर रुग्णाचा जीव वाचला असता. रुग्णालयातील अनागोंदीमुळेच 'तिचा' जीव गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या घटनेतून सिव्हिल हॉस्पिटलमधील सावळगोंधळही समोर आला. आता जिल्हा शल्यचिकित्सक या प्रकाराची गंभीर दखल घेवून संबंधितांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

रुग्णाला उपचार देताना कोणी हलगर्जीपणा केला असेल, तर निश्चितच याची चौकशी होवून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. तसेच ऑक्सिजन लिकेज प्रकरणातही तत्काळ आवश्यक त्या सूचना केल्या जातील.
                                  – डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news