पुढारी ऑनलाईन डेस्क : कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी ( दि. १५) रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस दोघांना प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, या प्रकरणावर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी सवाल उपस्थित केला आहे.
हा 'कोल्ड ब्लडेड' खून होता. या घटनेमुळे उत्तर प्रदेश कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतर जनतेचा देशाच्या संविधानावर आणि कायदा व सुव्यवस्थेवर विश्वास राहील का? असा सवाल करत ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी सत्ताधारी पक्ष भाजपवर निशाणा साधला आहे. मी नेहमीच म्हणत आलो आहे की, उत्तर प्रदेशात भाजप कायद्याच्या नियमाने नाही तर बंदुकीच्या जोरावर सरकार चालवत आहे. मारेकर्यांना ही शस्त्रे कशी मिळाली? त्यांना मारल्यानंतर ते धार्मिक घोषणा का देत होते? त्यांना दहशतवादी नाही, तर काय म्हणणार? त्यांना देशभक्त म्हणणार का? या घटनेचा आनंद साजरा करणारे लोक गिधाड आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली आहे.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांच्या हत्येचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 3 सदस्यीय न्यायिक आयोगाची स्थापना केली आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अरुण मौर्य (रा. कासगंज ), लवलेश तिवारी ( रा. बांदा) आणि सनी ( रा. हमीरपूर ) अशी आरोपींची नावे आहेत.
अतिक आणि अशरफ यांच्या हत्येत जिगाना बनावटीचे पिस्तूल वापरण्यात आले आहे. हे पिस्तूल तुर्कस्तानमध्ये बनवले असून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून येथे आणले जाते. भारतात या पिस्तुलावर बंदी आहे. त्याची किंमत सुमारे ६ ते ७ लाख रुपये आहे.
अहवाल घेऊन पोलीस महासंचालक मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आरके विश्वकर्मा यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विश्वकर्मा अहवाल घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेणार आहेत.
हेही वाचा