Agnipath Scheme Protest | ‘अग्निपथ’वरून देशभर आंदोलनाचा भडका; २०० रेल्वे सेवा ठप्प, सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जाळपोळ, १ ठार

Agnipath Scheme Protest | ‘अग्निपथ’वरून देशभर आंदोलनाचा भडका; २०० रेल्वे सेवा ठप्प, सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जाळपोळ, १ ठार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme Protest) देशभरातून जोरदार विरोध सुरु आहे. बिहारसह अन्य राज्यांत या योजनेविरोधात आगडोंब उसळला आहे. देशातील ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून यात रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. या आंदोलनामुळे देशभरातील एकूण २०० रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. देशभरातील ३५ रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत तर १३ रेल्वे सेवा काही वेळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, 'अग्निपथ' योजनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. यावेळी जखमींना सिकंदराबाद येथील गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या शेकडो उमेदवारांनी तेलंगणाच्या सिकंदराबाद शहरातील मुख्य रेल्वे स्थानकात मोठी तोडफोड केली आहे. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीआरपी दलाने सुमारे १५ राऊंड गोळीबार केला. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन पोलीस हवालदारही जखमी झाले. रेल्वेचे डीजी संदीप शांडिल्य आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंदोलकांनी दगडफेक करत रेल्वेच्या काही डब्यांना आग लावली. त्यांनी रेल्वेच्या इतर मालमत्तेचेही नुकसान केले आहे.

आंदोलकांनी ४-५ रेल्वे इंजिन आणि २-३ डबे पेटवून दिले आहेत. यामुळे किती नुकसान झाले आहे याचे माहिती घेत आहोत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सेवा तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरील विभागीय रेल्वे व्यवस्थापक एके गुप्ता यांनी दिली आहे.

बिहार आगडोंब कायम….

बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील दानापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी रेल्वे गाडी पेटवली. यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे १५०० आंदोलक येथे जमले होते. त्यांना दानापूर स्थानकावरील मालमत्तेची तोडफोड केली. यावेळी २४ आंदोलकांना अटक करण्यात आली. सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे आंदोलकांची ओळख पटवली जाईल. त्यानुसार एफआयआर नोंदवला आहे. येथील रेल्वे सेवा लवकरच पूर्ववत होईल अशी माहिती पाटणा डीएम डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी दिली आहे.

आंदोलनाचे लोण पश्चिम बंगाल पर्यंत पोहोचले…

सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधातील (Agnipath Scheme Protest) आंदोलनाचे लोण पश्चिम बंगाल पर्यंत पोहोचले आहे. तरुणांच्या काही गटांनी उत्तर २४ परगनामधील हावडा ब्रिज आणि भाटपारा येथे रास्ता रोको केला. बोनगाव-सियालदह मार्गावरील ठाकूरनगर रेल्वे स्थानकावरही अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात आले. यामुळे तासभर रेल्वे वाहतूक ठप्प झाली. सिलीगुडीतील सेवोके रोडवरही आंदोलन करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिल्ली गेट आणि जामा मशीद मेट्रो स्टेशनचे सर्व दरवाजे बंद केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news