अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल: आम्हाला तुमच्या वादाचं देणं-घेणं नाही; राज्याचे हित बघण्याचा दिला सल्ला

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल: आम्हाला तुमच्या वादाचं देणं-घेणं नाही; राज्याचे हित बघण्याचा दिला सल्ला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा. अपक्षेप्रामाणे हे अधिवेशन वादळी ठरत आहे. विरोधी पक्षांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आणखी तीन जणांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितला. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करत महाविकास आघाडीला खोचक टोले लगावले. त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मागच्या काही महिन्यापूर्वी शिवसेनेत बंड का झाले? याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दिली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कडक शब्दांत प्रत्युत्तर देत पुलोद सरकारची आठवण करुन दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचे हित बघावे, ठाकरेंच्या आणि तुमच्या वादात राज्यातील १३ कोटी जनतेला आणि मला काही देणं-घेणं नाही. शिंदे यांनी अशा छोट्या गोष्टीत रमू नये, अशी टीका अजित पवार यांनी केली.

राज्याच्या प्रमुखांनी अशा गोष्टींमध्ये न रमता राज्यातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचा समस्या याकडे लक्ष घालावे. विरोधकांवर टीका करण्यासाठी आमच्याकडे तयार झालेल्या दीपक केसरकरांना वेळ द्या, ते योग्य गोष्टी घेऊन टीका करतात, असा जोरदार टोलाही अजित पवारांनी लगावला. यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भरत गोगावलेंना उद्देशून अजित पवार म्हणाले की, तुम्ही मी बोलत असताना मध्ये जास्त बोलू नका. नाही तर तुम्हाला मंत्रिपद मिळताना अडचण येईल.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांच्या मागे लागण्यापेक्षा राज्यातील प्रश्नावर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. तसेच पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासोबत असलेल्या तुमच्या चांगल्या संबंधातून महाराष्ट्रासाठी काय मिळणार, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित करत एकनाथ शिंदेंच्या भाषणावरुन टोला लगावला. आपण राज्यातील 13 कोटी जनतेचे पालक आहात, असे वागावे म्हणत एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत.

महापुरुषांचा अपमान केल्याचा निषेध व्हायला हवाच. सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले. गेल्या 6 महिन्यांपूर्वी काय झाले हे आता सर्वांना माहिती आहे. झाले गेले ते सर्व सोडून पूर ताकदीने कामाला लागा. जुन्या गोष्टी उकरुन काढू नका, त्यांचा काहीच फायदा होणार नाही असे म्हणत अजित पवार यांनी नव्या वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील समस्यांवर लक्ष द्यावे असेही म्हटले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news