बनावटगिरी रोखण्यासाठी आता मिळणार ऑनलाइन प्रमाणपत्रे

बनावटगिरी रोखण्यासाठी आता मिळणार ऑनलाइन प्रमाणपत्रे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. या परीक्षांमधील टायपिंग, टीईटीसह अन्य प्रमाणपत्रे बनावट पध्दतीने तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्याला आळा घालण्यासाठी आता परीक्षा परिषद यापुढील सर्व परीक्षांची प्रमाणपत्रे ऑनलाइन देणार आहे. या प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल साइन आणि क्यूआर कोडचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

डॉ. बेडसे म्हणाले की, परीक्षा परिषदेकडून देण्यात येणारी सर्व प्रमाणपत्रे ऑनलाइन देण्याचा तसेच त्यांची पडताळणी क्यूआर कोडच्या माध्यमातून संबंधित संस्था तसेच अधिकार्यांना जागेवरच करण्याची सोय केली जाणार आहे. यामुळे यापुढे प्रमाणपत्रांच्या बनावटगिरीला पूर्णपणे आळा बसणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी 23 मध्ये झालेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी टायपिंग व लघुलेखन विषयासाठी एकूण 62 हजार 706 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 49 हजार 482 (उत्तीर्ण) विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि 13 हजार 224 (अनुपस्थित, अनुत्तीर्ण व राखीव) विद्यार्थ्यांना गुणपत्रक आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाइन स्वरूपात संबंधित संस्थांना संस्था लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ऑनलाइन प्रमाणपत्रांचा फायदा काय..?

निकाल लागल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत संबंधित उमेदवारांना प्रमाणपत्र/गुणपत्रक ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होईल.
प्रमाणपत्र हे डिजिटल स्वाक्षरीने देण्यात येणार असल्याने उत्तम सुरक्षितता असणार आहे व पर्यायाने आपोआपच गैरप्रकाराला आळा बसेल.
विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र हे कायमस्वरूपी संकेतस्थळावर (वेबसाइट) उपलब्ध राहणार असल्याने त्याची पडताळणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
ऑनलाइन प्रमाणपत्र, गुणपत्रक देण्यात येणार असल्याने
यापूर्वीच्या ऑफलाइन पध्दतीमधील प्रमाणपत्र छपाई तसेच सर्व जिल्ह्यांना प्रमाणपत्र पाठविण्याचा व वाहतुकीचा खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news