नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारचे कांदा निर्यातीबाबत धरसोड वृत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गत चार दिवसांत कांद्याच्या दरात सुमारे तीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे.
लाल कांद्याला ९ मार्चला सरासरी १८६०, तर उन्हाळ कांद्याला १७७५ रुपये भाव मिळाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दरात अस्थिरता निर्माण झाल्याने घाऊक बाजारात कांदा घसरला. बाजार समितीत उन्हाळ आणि लाल कांदा १४९० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या चार दिवसांत कांदादरामध्ये ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
यंदाचे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरले आहे. या हंगामात पाऊस कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. या अडचणीवर मात करूनही काही शेतकऱ्यांनी कांदा पीक जोमात घेतले. मात्र, निर्यातबंदीचे शुक्लकाष्ट लागल्यामुळे कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळालाच नाही. यामुळे शेतकऱ्यांना जवळपास दहा हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
मार्च महिना निम्मा झाला तरी दरात सुधारणा होईना, अशी स्थिती आहे. त्यात केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धरसोड वृत्तीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यानंतर केंद्र सरकारने ६४ हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र, इतक्या नगण्य निर्यातीमुळे कांदादरात कोणतीही सुधारणा झालेली नाही. अनेक देशांतून भारतीय कांद्याला प्रचंड मागणी आहे. मात्र, निर्यातबंदीच्या निर्णयात कांदा अडकला आहे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी मतदार नाराज होऊ नये म्हणून कांदा निर्यातीवरील निर्बंध कायम ठेवले परंतु शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मुबलक उत्पादन होऊनही दरावर नियंत्रण ठेवत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेकडून होत आहे. कांद्याचे उंचावणारे दर डोकेदुखी ठरू नये म्हणून सरकार निर्यात पूर्णत: खुली करण्याच्या मानसिकतेत नाहीत. उलट निर्यातबंदीचा निर्णय लादून दर आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
दर हजारांवर येण्याची भीती
येथील मुख्य बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान ६०० रु., सरासरी १४९१ रु., कमाल १६४७ रु. दर मिळाले. तर उन्हाळ कांद्याला किमान ७०० रु., सरासरी १४९० रु. तर कमाल १६०० रु. दर मिळाले.