कांदा पेटला : नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आजपासून बेमुदत बंद

File Photo
File Photo

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

कांदा निर्यातशुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी व निर्यातदार यांच्या लासलगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बंदचा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याने बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली, तर ते लिलाव काढून त्यानंतर बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांच्या विनंतीनुसार बेमुदत बंदचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला असून, या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.

बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, सोहनलाल भंडारी, नितीन ठक्कर, नितीन जैन, मनोज जैन, नंदकुमार डागा, नंदकुमार अट्टल, रिकबचंद ललवानी, नितीन कदम, भिका कोतकर, रामराव सूर्यवंशी, दिनेश देवरे, पंकज ओस्तवाल तसेच जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे व्यापारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. केंद्र सरकारची अधिसूचना निघण्याअगोदर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यातीसाठी रवाना झाला. परंतु रस्त्यातच हा माल अडकला आहे. याचा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने व्यापाऱ्यांनी या बैठकीत चिंता व्यक्त केली. त्यांनीही केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

कांद्याचे दर दोन हजार रुपयांच्या पुढे गेले की, हे दर कमी कसे करता येतील, यासाठी केंद्र सरकार अतिशय तत्परतेने निर्यातशुल्क लादून किंवा निर्यातबंदीसारखे निर्णय घेऊन हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत शेतकऱ्यांना हेतुपुरस्सर त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्याकडून केला जात आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news