नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ऐन निवडणूक हंगामात कांद्याचे दर कडाडल्याने हा राजकीय मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकारने एनसीसीएफ, नाफेड, केंद्रीय भांडार तसेच राज्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून २५ रुपये किलो दराने कांदाविक्रीला सुरवात केली आहे. यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह २१ राज्यांमध्ये साडेसातशेहून अधिक विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दिल्लीमध्ये केंद्रीय भंडार, मदर डेअरी, सफल या संस्थांच्या विक्रीकेंद्रांवर ग्राहकांना कांदा खरेदी करता येणार आहे
कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने अलिकडेच निर्यातीवर ८०० डॉलर प्रतिटन निर्यात शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता किरकोळ बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आरंभले आहेत. त्यासाठी नाफेडने २१ राज्यांमधील ५५ शहरांमध्ये दुकाने आणि मोबाईल व्हॅन यांचा समावेश असलेली ३२९ किरकोळ विक्री केंद्रे उभारली आहेत. तर राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाने (एनसीसीएफ) २० राज्याच्या ५४ शहरांमध्ये ४५७ किरकोळ विक्री केंद्रे स्थापन केली आहेत. त्याच धर्तीवर, दिल्लीमध्ये देखील केंद्रीय भांडारच्या विक्री केंद्रांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहे. तर सफल आणि मदर डेअरी तर्फे कांदा विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. खरीपाचा कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याने कांद्याचे दर वाढले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे राखीव साठ्यातील कांद्याची २५ रुपये किलो या अनुदानित दराने विक्री सुरू केली आहे. याआधी निर्यात शुल्क वाढविण्याबरोबरच राखीव साठ्यामध्ये दोन लाख टनांनी वाढ करण्यात आली असून त्यासाठी ५.०६ लाख टन कांदा खरेदी केला आहे. तसेच दोन लाख टन कांदा खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, सणासुदीच्या काळात सरकारने भारत डाळ या ब्रॅन्ड खाली चणा डाळीची विक्री वाढविण्याचाही निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारत डाळीचा पुरवठा वाढवण्यात येणार असून यामुळे चार लाख टनांहून अधिक भारत डाळ उपलब्ध होणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारने एक किलोच्या पॅकसाठी ६० रुपये प्रतिकिलो तर ३० किलोच्या पॅकसाठी ५५ रुपये प्रतिकिलो अशा अनुदानीत दराने भारत डाळ विक्री सुरू केली आहे. नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार, सफल तसेच तेलंगाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधील सहकारी संस्थांच्या माध्यमातून भारत डाळीची विक्री केली जाणार आहे. देशभरात २८२ शहरांमधील ३०१० विक्री केंद्रांमार्फत ही विक्री केली जात आहे.
हेही वाचा