लासलगाव; पुढारी वृत्तसेवा : कांद्या मिळणार्या दराचा लहरीपणा हा काही शेतकऱ्यांसाठी नवीन राहिलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याला मिळत असलेल्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांद्याचे दर किती लहरी आहेत, याचा प्रत्यय पुन्हा शेतकऱ्यांना येत आहे. यात आणखी भर पडत येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक येथील शेतकरी सुशील दुघड यांच्या कांद्याला ५० पैसे प्रति किलो दर मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकरी सुशील दुघड यांनी गुरुवारी (ता. १९) रोजी २० क्विंटल कांदा विंचूर उपबाजार आवारात विक्रीसाठी नेला होता. कांद्याची प्रतवारी तुलनेत थोडी कमी असल्याने लिलावात या कांद्याला ५१ रुपये प्रति क्विंटल शिव भोले या कंपनीने बोली लावली. अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकरी सुशीलने कांदा माघारी घेऊन गेला. गेल्या चार दिवसापासून दोन मजूर कामाला लावून कांद्याची प्रतवारी केली आणि विंचूर उपबाजार समितीमध्ये कांदा विक्रीस आणला. मात्र, एवढा खर्च होऊनही कांद्याला पाच पैसे प्रति किलो असा दर मिळाला.
यानंतर शेतात पिकवायचे तरी काय? असा संतप्त सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. कांद्याला ५० पैसे प्रति किलो असा दर मिळाल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. तर बाजार समिती प्रशासनाने याबाबत सांगितले की, लिलावास आलेला कांदा हा खूपच कमी गुणवत्ता असलेला असून खाण्या योग्य व प्रतवारी केलेला नसल्याने या कांद्याला जाहीर लिलावात कमी दर मिळाला आहे.
हेही वाचलंत का?