सोलापूर : कांदा लिलाव पाच दिवस बंद

 सोलापूर : कांदा लिलाव पाच दिवस बंद
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवार दि. 10 ते सोमवार दि. 15 जानेवारी (शुक्रवार वगळता) दरम्यान सलग पाच दिवस कांदा लिलाव बंद राहणार आहे. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे.
बाजार समितीमध्ये मंगळवारी आठशेपेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक आहे. त्यामुळे बाजार समिती व्यापारी संघांनी बुधवारी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गुरुवारी वेळ अमावस्या असल्याने कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवार दि. 12 रोजी कांद्याचे लिलाव होणार आहेत. मात्र, शनिवार, रविवारी आणि सोमवारी श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवार वगळता पुढील तीन दिवस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मालांचा लिलाव बंद राहणार आहे.
दरावर पुन्हा परिणाम…
दरम्यान केंद्र सरकारने कांदा  निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत. त्यात आता पाच दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतल्यामुळे येत्या मंगळवारी पुन्हा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार असून, त्याचाही दरावर परिणाम होणार आहे.
कांद्याची वाढलेली आवक, वेळ अमावस्या, मकर संक्रांतनिमित्त दोन दिवशी कांदा लिलाव बंद तर तीन दिवस मार्केट यार्ड असे एकूण पाच दिवस कांदा लिलाव बंद राहणार आहे. शेतकर्‍यांनी या काळात कांदा बाजार समितीमध्ये आणू नये.
-निहाल वैरागकर, अडते, बाजार समिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news