पुढारी ऑनलाईन डेस्क : 'वीर बाल दिवस' (Veer Baal Diwas) हे भारतीयतेच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्याचे प्रतीक आहे. आज देश शूर साहिबजादांच्या अमर बलिदानाचे स्मरण करून त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात वीर बाल दिवसाच्या रूपाने नवा अध्याय सुरू झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्ली येथे येथे वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित होते.
भारत मंडपम येथे 'वीर बाल दिवस' (Veer Baal Diwas) उत्सव कार्यक्रमानिमित्त शीख समुदायाच्या सदस्यांनी गतका (शीख मार्शल आर्ट) सादर केले. त्यानंतर पंतप्रधानांनी तरुणांच्या मार्चपास्टला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना पतंप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी, देशात पहिल्यांदा २६ डिसेंबर हा दिवस शौर्य बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण देशातील प्रत्येकाने मोठ्या भावनेने साहिबजादांच्या शौर्यगाथा ऐकल्या. यावर्षी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूएई आणि ग्रीस यांनी 'वीर बाल दिवस' संबंधित कार्यक्रम आयोजित केले आहेत. वीर बाल दिवस हे भारतीयत्वाच्या रक्षणासाठी काहीही करण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की शौर्याला वय नसतं. आम्हाला एक सेकंदही वाया घालवायचा नाही किंवा थांबण्याची गरज नाही. गुरूंनी आम्हाला ही शिकवण दिली. देशाच्या अभिमानासाठी आणि गौरवासाठी जगले पाहिजे, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आजचा भारत 'गुलामगिरीच्या मानसिकतेतून' बाहेर पडत आहे, याचा मला आनंद आहे. आजच्या भारताचा आपल्या लोकांवर, त्यांच्या क्षमतांवर आणि त्यांच्या प्रेरणेवर पूर्ण विश्वास आहे. साहिबजादांचे बलिदान आजच्या भारतासाठी राष्ट्रीय प्रेरणेचा विषय असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.