Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो राज ठाकरेंनी केला शेअर

Mahaparinirvan Diwas
Mahaparinirvan Diwas
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतरत्न, भारतीय राज्‍यघटनेचे शिल्‍पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगेबाबा एकत्र असलेला  फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. त्यांनी आवाहन केले आहे की,"महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा."(Mahaparinirvan Diwas) 

Mahaparinirvan Diwas : महापुरुष ह्या भूमीत होऊन गेले….

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंनी आपल्या 'X' खात्यावर फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की, त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात. महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष ह्या भूमीत होऊन गेले.

स्वराज्याची मुहूर्तमेढ ह्याच राज्यात झाली. स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य ह्याच राज्यात आकाराला आलं. शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित-पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण ह्याच भूमीतील. हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो. तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. ह्याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे. ह्यातून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं, स्वभान देणारं हे राज्य आहे ह्याचं भान गमावू नये. उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल. आजचा महापरिनिर्वाण दिन ह्यासाठी महत्वाचा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश, हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घेण्याचा हा दिवस. पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन."

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news