कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : ओमायक्रॉनची (Omicron) रुग्ण संख्या वाढत असलेल्या जोखीमग्रस्त देशांपैकी सहा देशांतील 30 नागरिक आतापर्यंत कोल्हापुरात दाखल झाले आहेत. या सर्वांची कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) करण्यात आली असून सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
कोरोनाच्या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी सर्व देश तयारीत असताना ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला आणि त्याची संपूर्ण जगभर चर्चा सुरू झाली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानसेवेवर निर्बंध घालण्यात आले.
खबरदारीचा उपाय म्हणून वरील देशातील विमानांना बंदी घालण्यात आली. ज्या देशांच्या विमानसेवा सुरू ठेवण्यात आली, त्यामधील प्रवाशांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. कोल्हापुरात आतापर्यंत 375 नागरिक परदेशातून आले आहेत. त्यापैकी 225 नागरिकांचा शोध लागला आहे. त्यातील 202 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या सर्व व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु, अद्याप 150 नागरिकांचा शोध लागलेला नाही. त्याचा शोध आरोग्य यंत्रणेच्या वतीने घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Omicron)
परदेशातून आलेल्या 375 नागरिकांमध्ये शहरातील सर्वाधिक 191 नागरिकांचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र एकही परदेशी नागरिक आला नसल्याची नोंद आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी 30 नागरिक हे जोखीमग्रस्त देशांतून आलेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 14 नागरिक सिंगापूरमधून आले आहेत. त्यानंतर युनायटेड किंगडमचा क्रमांक लागतो.
युनायटेड किंगडममधून 8 नागरिक आले आहेत. याशिवाय नेदरलँड, ब्राझील, इटली व पॅरिसमधून आलेल्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. या 30 नागरिकांपैकी 21 नागरिक शहरातील आहेत, तर नऊ नागरिक ग्रामीण भागातील आहेत. त्यात हातकणंगले तालुक्यातील सात व करवीर आणि आजरा तालुक्यातील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.