पुढारी ऑनलाईन डेस्क : Omicron corona variant: कोव्हिड १९ चा दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवा व्हॅरिएंट ओमिक्रॉन लसीला चकवा देऊ शकतो, असं मत AIIMSचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलेलं आहे. या संदर्भातील बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने पीटीआयच्या हवाल्याने दिली आहे.
गुलेरिया यांनी म्हटलेलं आहे की नव्या व्हॅरिएंटमध्ये ३०च्या वर बदल झालेले आहेत. हे बदल विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमध्ये झालेले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या लसीमुळे जे रोगप्रतिकार शक्ती शरीरात निर्माण झालेली आहे, त्याला चकवा देऊ शकते.
गुलेरिया म्हणाले की स्पाईक प्रोटिनमध्ये झालेले बदल लशीची परिणामकारकता नष्ट करू शकतील.
बरेच व्हॅक्सिन या स्पाईक प्रोटिनची परिणामकारकरता नष्ट करण्याच्या हेतूने बनवण्यात आल्या आहेत.
पण नव्या कोरोना व्हॅरिएंटमध्ये स्पाईक प्रोटिनमध्ये ३०च्या वर बदल झालेले आहेत. त्यामुळे नवा व्हॅरिएंट व्हॅक्सिनला न जुमण्याची भीती आहे.
जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर भारताला उपलब्ध लशींवर पुन्हा विचार करावा लागेल.
तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी, ज्या भागात कोरोनाचा उद्रेक होईल तेथील स्थितीवर यावर फार बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे, असे ते म्हणाले.
१५ डिसेंबर २०२१ पासून नियमित आंतरराष्ट्रीय हवाई सेवेला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रसरकारकडून देण्यात आली होती.
याबाबत मागच्या दोन दिवसांपुर्वी हवाई वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी अशी माहिती दिली होती.
दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा ओमीक्रॉन व्हेरियंट सापडल्याने आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू करण्याबाबत नव्याने विचार करणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले.
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन व्हेरियंट सध्या आफ्रिकेत आढळला असून अन्य ११ देशांमध्येही त्याचा फैलाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्कालिन बैठक बोलविली. या बैठकीत विमान उड्डाण्णांसह कठोर निर्बंधांबाबत चर्चा झाली.
ओमिक्रॉन व्हेरियंटचा फैलाव झाल्यास तिसरी लाट वेगाने येण्याचा धोका आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या ठराविक देशांमध्ये सुरू असलेली विमानसेवा या व्हेरियंटचा फैलाव करू शकते. त्यामुळे त्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यात ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी ही बंदी वाढविण्यात आली होती.
मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई सेवा बहाल केली जाणार असल्याचे अलीकडेच केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.
यावर पुन्हा विचार होणार असल्याचे मंत्रायलाकडून सांगण्यात आले.