ऑलिव्ह रिडले कासवांचा 5,000 कि.मी.चा अद्भुतरम्य प्रवास

ऑलिव्ह रिडले कासवांचा 5,000 कि.मी.चा अद्भुतरम्य प्रवास
Published on
Updated on

ठाणे : कोकण किनारपट्टीवरील गेली 25 वर्षे सुरू असलेल्या कासव संवर्धन मोहिमेला आता आणखी बळ मिळाले आहे. ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या संरक्षित जातींचा प्रवास हा पाण्याखालून 5,000 किलोमीटरपर्यंत होत असल्याचे सॅटेलाईट ट्रान्स्मीटरच्या माध्यमातून आता समोर आले आहे. समुद्री कासवांच्या संवर्धनाच्या मोहिमेत सहभाग घेणार्‍या संशोधकांना या अद्भुतरम्य प्रवासाचा वेध घेता आल्याने या मोहिमेचे बळ वाढले आहे.

फेब्रुवारी 2022 ला ऑलिव्ह रिडले जातीचे एक कासवीण अंडे घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्री किनार्‍यावर आली होती. जिथे या कासवांचा जन्म होतो, त्याच मातीच्या ओढीने मादी कासव त्याच किनार्‍यावर अंडी घालून आपल्या पिल्लांना जन्म देते. अशाच गुहागर किनार्‍यावर आलेल्या या कासव मादीला संशोधकांनी 'भाग्यश्री' हे नाव देऊन सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवला. या ट्रान्स्मीटर वरून समुद्रातील प्रवासाचे ट्रेकिंग करण्यात आले. या ट्रेकिंगमध्ये सात महिन्यात भाग्यश्रीने 5,000 किलोमीटरचा पल्ला गाठल्याचे समोर आले. अजूनही तिचा प्रवास सुरूच आहे. या भाग्यश्री कासविणीने अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा ते कन्याकुमारी असा किनार्‍यालगतच्या प्रवास करत ती श्रीलंकेला जाऊन पोहोचली. श्रीलंकेच्या किनार्‍यालगत हिंदी महासागरात ती बरेच दिवस वास्तव्याला होती. तेथून तिने बंगालच्या उपसागराचा मार्ग घेतला. बंगालचा उपसागर ते श्रीलंका या भागात ती स्थिरावली आहे. मात्र, या भागात राहणारी कासवीण अंडी घालण्यासाठी एवढ्या लांबचा पल्ला गाठून पश्चिम किनार्‍यावर गुहागरला का आली?, याचा शोध घेतल्यानंतर गुहागर किनार्‍यावर तिचा जन्म झाल्याचे या याबाबतचे संशोधन करणारे डॉक्टर सुरेश कुमार यांनी सांगितले.

ऑलिव्ह रिडले जातीची कासवे ज्या किनार्‍यावर जन्म होतो, त्या किनार्‍यावरची नोंद यांच्या मेंदूत होते. किनार्‍यावरून समुद्रात जाताना किनार्‍याचे ठसे त्यांच्या मेंदूत संकलित होतात. जेव्हा ही कासवे मोठी होतात तेव्हा ती अंडी देण्यासाठी त्याच किनार्‍यावर येतात, असे कासव संशोधकांचे मत आहे. हीच भाग्यश्री पुन्हा ही अंडी घालण्यासाठी गुहागर किनार्‍यावर येईल, असा संशोधकांचा अंदाज आहे.

खरं तर बंगालच्या उपसागरात जाणारी भाग्यश्री त्याच किनार्‍यावर अंडी घालू शकते. मात्र, ऑलिव्ह रिडले जातीचे कासवे आपला पारंपरिक बाज सोडत नाहीत. जिथे जन्म झाला तिथेच नवनिर्मिती अशी त्यांची जीवनशैली असते. म्हणूनच सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत 20 ते 25 किनार्‍यांवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येत असतात.

भारताच्या पश्चिम किनार्‍यावर येणार्‍या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संशोधनासाठी संशोधकांनी 8 ते 9 कासवांना सॅटेलाईट ट्रान्स्मीटर बसवले आणि त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅन ग्रोव्ह सेल्स आणि विल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातीलच एक भाग्यश्री ही फेब्रुवारी महिन्यात अंडी घालण्यासाठी गुहागर किनार्‍यावर आली होती. तिने खड्डा खणून 150 अंडी घातली खड्डा बुजवून ती पुन्हा परतत असताना तिच्यावर सॅटेलाईट ट्रान्स्मीटर बसवण्यात आला. प्लास्टिक प्रदूषणामुळे समुद्री कासवांच्या जाती धोक्यात आल्या आहेत. ऑलिव्ह रिडले कासव जेलिफिशसारखे मासे खातात; मात्र समुद्रात तरंगरे प्लास्टिक त्यांना आपले भक्ष्य वाटत असे प्लास्टिक खाऊन ही कासवे मृत्युमुखी पडतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news