श्रीगोंदा : अधिकारी खाकीत अन् कर्मचारी साध्या वेशात; नेमका काय आहे प्रकार ?

श्रीगोंदा : अधिकारी खाकीत अन् कर्मचारी साध्या वेशात; नेमका काय आहे प्रकार ?

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : खाकी वर्दीत असणारा पोलिस समोर दिसला तरी भल्या भल्यांना घाम फुटतो; परंतु हीच खाकी वर्दी परिधान करण्याचा कंटाळा पोलिसाला आला की काय अशीच परिस्थिती काल (दि. 22) श्रीगोंदा शहरात पाडव्याच्या मुहूर्तावर दिसली. शहरातून पेट्रोलिंग दरम्यान अधिकारी खाकीत होते तर काही कर्मचारी साध्या वेशात होते. ही गोष्ट श्रीगोंदा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

खाकी वर्दीत असणारा साधा पोलिस कर्मचारी हजारो लोकांच्या जमावावर नियंत्रण मिळवू शकतो. वर्दीतील पोलिस दिसला तरी गुन्हेगार त्या परिसरातून काढता पाय घेतो. खाकी वर्दीची भीती आजही कायम आहे. अनेक पोलिस अधिकारी वर्दीच्या बाबतीत दक्ष असतात. आणि ते असलेही पाहिजे; मात्र गेल्या काही वर्षात पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यात साध्या वेशात राहण्यातच जास्त पसंती देत आहेत. यामुळे पोलिस ठाण्यात पोलिस कोण अन तक्रारदार कोण? हेच कधी-कधी समजून येत नाही.

पोलिस ठाण्यात कार्यरत असताना खाकी वर्दीवर असणे बंधनकारक असते. स्थानिक गुन्हे शाखा, गोपनीय शाखा आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत पोलिस कर्मचार्‍यांना वर्दीबाबत सूट देण्यात आली आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बोटावर मोजण्याइतके पोलिस कर्मचारी खाकी वर्दीवर असतात. पोलिस टोपी तर वरिष्ठ अधिकारी आले तरच घातली जाते. इतर वेळी ही टोपी कुठे असते हा एक प्रश्नच आहे.

गुढी पाडव्यानिमित्त श्रीगोंदा पोलिसांनी काल (दि. 22) सायंकाळच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील मुख्य बाजारपेठातून पायी पेट्रोलिंग केले. यामध्ये पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलिस उपनिरीक्षक अमित माळी हे दोन अधिकारी खाकी वर्दीत, तर इतर पोलिस कर्मचारी साध्या वेशात पेट्रोलिंग करत होते.पोलिस अधिकारी खाकी वर्दीत अन् पोलिस साध्या वेशात ही गोष्ट चाणाक्ष नागरिकांच्या नजरेतून सुटली नाही. अन पोलिसांनी केलेल्या पेट्रोलिंगची दिवसभर चर्चा सुरू होती.

गोंधळ होऊ नये म्हणून पेट्रोलिंग : अमित माळी
पोलिस उपनिरीक्षक अमित माळी यांना विचारले असता पाडव्याच्या दिवशी शहरात कुठे गोंधळ होऊ नये. खबरदारीचा एक उपाय म्हणून श्रीगोंदा शहरात पायी पेट्रोलिंग करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news