दुबई (वृत्तसंस्था) : रु 18,36,69,52,205 हा आकडा मोजताना त्रास होत असेल तर सोपा करून सांगतो, ही रक्कम आहे… 1836 कोटी 69 लाख 52 हजार 205 रुपये आणि सौदी अरेबियातील एका क्लबने फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला ही ऑफर दिली आहे. यावरून 37 वर्षीय रोनाल्डोला मार्केटमध्ये अजूनही डिमांड आहे हे लक्षात येते.
पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कतारला रवाना होण्यापूर्वी मँचेस्टर युनायटेड क्लबसोबतचे सर्व संबंध तोडून आला. रेयाल माद्रिद सोबतचा कित्येक वर्षांचा पर्वास रोनाल्डोने युव्हेंटस् क्लबकडून खेळण्यासाठी सोडला आणि त्यानंतर काही वर्षांतच तो पुन्हा जुना क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये परतला.
सर अॅलेक्स फर्ग्युसन यांनी सर्वात प्रथम रोनाल्डोला या क्लबमध्ये आणले होते आणि तिथेच खर्या अर्थाने पोर्तुगालच्या या स्टारचा प्रवास सुरू झाला. त्याच क्लबमधून त्याच्या फुटबॉल कारकिर्दीला विराम लागतो की काय, अशी शंका उपस्थित होत होती. पण, 37 वर्षीय रोनाल्डोला मार्केटमध्ये अजूनही डिमांड आहे.
मँचेस्टर युनायटेडला सोडल्यानंतर आता रोनाल्डो कोणत्या क्लबकडून खेळेल याची सर्वांना उत्सुकता होती. अनेकांनी रोनाल्डो व लियोनल मेस्सी हे स्पर्धक आता पॅरीस सेंट जर्मेन क्लबकडून एकत्र खेळताना दिसतील, असा अंदाज बांधला. पण, आता सौदी अरेबियाच्या अल-नासर फुटबॉल क्लबने रोनाल्डोला तगडी ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे.
सौदी अरेबियातील या क्लबने रोनाल्डोला वर्षाला 62 मिलियन पौंड देण्याची ऑफर दिली आहे आणि तीन वर्षांचा हा करार असणार आहे. म्हणजेच रोनाल्डोला 186 मिलियन पाऊंड देण्याची तयारी या क्लबने दाखवल्याचे वृत्त द सन या दैनिकाने दिले आहे. भारतीय रकमेत सांगायचे झाले तर रोनाल्डोला तीन वर्षांसाठी 1836 कोटी 69 लाख 52,205 रुपये देण्याची तयारी अरेबियन क्लबची आहे. त्यामुळे 40 व्या वर्षांपर्यंत रोनाल्डोला खेळताना पाहण्याची संधी त्याच्या फॉलोअर्सना मिळणार आहे. रोनाल्डोची आठवड्याची कमाई ही 11 कोटी, 84 लाख 96, 465 इतकी असणार आहे.