तीन हजार प्रकाशवर्षे अंतरावरून एलियन्सकडून मानवाचे निरीक्षण!

तीन हजार प्रकाशवर्षे अंतरावरून एलियन्सकडून मानवाचे निरीक्षण!

वॉशिंग्टन : एलियन्स आहेत की नाहीत, यावरून अद्याप संदिग्ध अवस्थाच आहे. मागील वर्षानुवर्षे यावर संशोधन सुरू असले तरी ज्याप्रमाणे एलियन्स आहेत, याचा ठोस दावा करणे शक्य झालेले नाही, त्याचप्रमाणे एलियन्स नाहीत, असेही ठामपणे सांगता येण्यासारखी परिस्थिती नाही, ही वस्तुस्थिती आहे. एलियन्सच्या अस्तित्वावरून बरेच मतभेद आहेत. आता वेळोवेळी यावर संशोधन होत असते आणि याच संशोधनातून शास्त्रज्ञांनी एलियन डिक्शनरीदेखील तयार केली आहे. आता एलियन्सबाबत आणखी एक नवे संशोधन झाले असून, यात एलियन्स मनुष्याला पाहत असून यासाठी त्यांच्याकडे आधुनिक उपकरणेदेखील आहेत, असा अजब दावा करण्यात आला आहे. हा शोधनिबंध एक्स्ट्रा अ‍ॅस्ट्रोनॉटिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. आर वुई व्हिजिबल टू अ‍ॅडव्हान्सड एलियन सिव्हिलायझेशन, असे या शोधनिबंधाचे शिर्षक आहे.

या शोधनिबंधात असा दावा करण्यात आला आहे की, एलियन्स आपल्याला अतिशय प्रगत अशा दुर्बिणीच्या माध्यमातून 3 हजार प्रकाशवर्षे अंतरावरून पाहत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या एलियन्सना पृथ्वीवरील सद्यस्थितीची चाहूल चक्क 3 हजार वर्षांनंतर लागू शकेल. सध्या ते आपला भूतकाळ पाहू शकतात, असा दावा यात केला गेला आहे.

या संशोधन पथकाचे नेतृत्व करत असलेल्या सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजेन्स इन्स्टिट्यूटचे जेडएन उस्मानोव्ह असे म्हणतात की, ज्या अंतरावरून एलियन्स सध्या आपल्याला पहात आहेत, ते अंतर 3 हजार प्रकाशवर्ष इतके आहे. भौतिकी नियमाच्या आधारे आपण हा दावा करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एलियन्स आपले सातत्याने निरीक्षण करत आहेत. पण, आपल्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांना आणखी हजारो वर्षे लागू शकतात, असा या संशोधन पथकाचा दावा आहे. सदर एलियन्स आपल्यापेक्षा बरेच प्रगत असू शकतात, अशीही भीती या पथकाने व्यक्त केली व यावरुन आजवर अनेक दावे-प्रतिदावे केले गेले आहेत. मात्र, हे एलियन्स कित्येक हजारो वर्षे आपल्याशी संपर्क साध शकणार नाहीत, याबाबत मात्र विविध संशोधकात एकमत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news