पुणे : मुलांमध्ये वाढतेय स्थूलता; चुकीच्या आहाराचा आरोग्यावर परिणाम

पुणे : मुलांमध्ये वाढतेय स्थूलता; चुकीच्या आहाराचा आरोग्यावर परिणाम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आजकाल बहुतांश आजार चुकीच्या जीवनशैलीमुळे बळावताना दिसत आहेत. विशेषत: असंतुलित आहार हा चुकीच्या जीवनशैलीत सर्वात मोठा घटक ठरत आहे. जंकफूडचे अतिसेवन, हिरव्या भाज्या आणि फळांचे कमी सेवन, वाढलेला स्क्रीन टाईम यामुळे लहान मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

कोरोना काळात ऑफलाइन शाळा बंद असल्याने, मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाल्याने मुलांच्या हालचालींवर मर्यादा आल्या. दिवसभर सर्व जण घरी असल्याने विविध पदार्थ घरीच केले जाऊ लागले, आहाराचे सेवन वाढले आणि परिणामी मुलांमध्ये वजन वाढण्याची समस्या बळावली, याकडे बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत जगताप यांनी लक्ष वेधले.

कोरोना काळानंतरही मुलांच्या आहाराच्या सवयी पूर्णपणे बदललेल्या नाहीत. जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ मुलांना लवकर आवडतात. त्यातच चॉकलेट, वेफर्स, जंकफूड आदींच्या जाहिरातींचा टीव्हीवरून मुलांवर भडिमार होत असतो. त्यामुळे हेच पदार्थ मुलांना हवेहवेसे वाटू लागतात. मुलांचे लाड करण्याच्या नावाखाली पालकही मुलांना जंकफूड खाऊ घालतात. या सवयींचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ लागतो.

काय होऊ शकते?
मुलांमधील आत्मविश्वास, चपळता कमी होणे
शाळेत, मित्रांमध्ये स्थूलतेवरून चिडवले जात असल्याने चिडचिड होणे, एकलकोंडेपणा
लहान वयात मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्या बळावणे
मुलांमध्ये आळस, सतत बसून राहण्याची वृत्ती वाढीस लागणे

काय काळजी घ्यावी?
पालकांनी महिन्याच्या किराणा सामानामध्ये मॅगी, बिस्किटे, वेफर्स, कोल्ड्रिंक यांसारखे पदार्थ घरात आणणे टाळावे.
दररोजच्या आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे यांचा पुरेसा समावेश असणे
मुलांना हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा खाण्याची सवय लावावी.
पिझ्झा, बर्गर, गोड पदार्थ असे पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात, हे मुलांना समजावून सांगावे.

अन्नाचे अतिरेकी सेवन केल्याने मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मुले पालकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे केवळ हे खा, ते खाऊ नको, असे उपदेश मुलांना करण्यापेक्षा पालकांनी स्वत:च्या जीवनशैलीमध्ये जाणीवपूर्वक बदल करून समतोल आहाराला महत्त्व द्यावे.
                                        – डॉ. अर्चना कुलकर्णी, आहारतज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news