टी-20 वर्ल्ड कप 2021 : कोण होणार विश्वविजेता?

टी-20 वर्ल्ड कप 2021 : कोण होणार विश्वविजेता?

दुबई ; वृत्तसंस्था : टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड (NZ vs AUS) हे दोन संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. रविवारी 14 नोव्हेंबरला दुबईच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे. आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला नमवून न्यूझीलंडने फायनल गाठली आहे.

दुसरीकडे यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करणार्‍या पाकिस्तानला शह देत ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. दोन्ही संघांनी अद्याप एकदाही टी-20 वर्ल्डकप जिंकला नसल्याने यावर्षी स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार हे निश्चित आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा एकमेकांसमोर आले आहेत. मात्र, आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत जेतेपदासाठी या दोन्ही संघांतील सामना खास असाच आहे. ऑस्ट्रेलिया दुसर्‍यांदा तर न्यूझीलंड पहिल्यांदा टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचले आहेत. (NZ vs AUS)

दोन्ही संघ विजेतेपदापासून वंचित आहेत आतापर्यंत कोणत्याही टी-20 वर्ल्ड कपमध्ये हे दोन संघ फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडलेले नाहीत. 2015 मध्ये वन-डे वर्ल्डकपमध्ये या दोन्ही देशांत फायनलचा सामना रंगला होता. यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती.

प्लेअर टू वॉच (NZ vs AUS)

डेव्हिड वॉर्नर : डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा सध्या 35 वर्षांचा असला तरी त्याची खेळी तरुणांना लाजवेल अशी आहे. 'पॉवर प्ले'मध्ये पॉवर हिटिंग ही त्याची खासियत. सेमीफायनलमध्ये वॉर्नरने चांगला पाया रचल्यामुळे मॅथ्यू वेड व मार्कस स्टोईनिस यांना विजयाचा कळस चढवता आला. वॉर्नरने 87 सामन्यांत 2,501 धावा केल्या असून, यात एक शतक तर 20 अर्धशतके आहेत.

मार्कस स्टोईनिस : मध्यमगती गोलंदाज आणि आक्रमक 'फिनिशर' अशी त्याची ओळख आहे. तो 4-5 क्रमांकावर फलंदाजीस येतो. त्याच्याकडे चांगली 'हिटिंग पॉवर' असल्यामुळे संघात त्याच्याकडे 'फिनिशरचा रोल' आहे. तो 'पॉवर प्ले' किंवा 'डेथ ओव्हर' यापैकी कुठेही गोलंदाजी करू शकतो. 34 सामन्यांत त्याच्या नावावर 456 धावा आणि दहा विकेटस् आहेत.

ऑस्ट्रेलिया संभाव्य संघ : 1) डेव्हिड वॉर्नर, 2) अ‍ॅरोन फिंच, 3) मिचेश मार्श, 4) स्टिव्ह स्मिथ, 5) ग्लेन मॅक्सवेल, 6) मार्कस स्टोईनिस, 7) मॅथ्यू वेड, 8) पॅट कमिन्स, 9) मिशेल मार्श, 10) अ‍ॅडम झम्पा, 11) जोश हेझलवूड.

न्यूझीलंड : 1) मार्टिन गुप्टिल, 2) डॅरेल मिचेल, 3) केन विल्यम्सन, 4) टीम सैफर्ट, 5) ग्लेन फिलिप्स, 6) जेम्स नीशाम, 7) मिचेल सँटेनर, 8) टीम साऊदी, 9) अ‍ॅडम मिल्ने, 10) ट्रेंट बोल्ट, 11) ईश सोढी.

मार्टिन गुप्टिल : वन-डेमध्ये द्विशतक नावावर असलेला मार्टिन गुप्टिल हा न्यूझीलंडचा टी-20 मधील भरवशाचा खेळाडू आहे. उसळत्या चेंडूवर एका पायावर पूलचा फटका मारण्याचे त्याचे कौशल्य वादातीत आहे. 104 टी-20 डावांत त्याच्या नावावर 3,119 धावा आहेत. यात दोन शतके आणि 18 अर्धशतके आहेत.

डॅरेल मिचेल : इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये नाबाद 72 धावा करून न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहोचवणारा डॅरेल मिचेल हा संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो. 2019 मध्ये भारताविरुद्ध त्याने टी-20 मध्ये पदार्पण केले. आक्रमक फलंदाज आणि उपयुक्त मध्यमगती गोलंदाज म्हणून तो प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्याने आतापर्यंत 19 डावांत 345 धावा केल्या आहेत. 6 सामन्यांत त्याने गोलंदाजी करताना 5 विकेटस् घेतल्या आहेत.

पिच रिपोर्ट

अंतिम सामन्यासाठी दुबईच्या स्टेडियमवरील फ्रेश खेळपट्टीचा वापर करण्यात येणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजीला पूरक असेल. विशेष म्हणजे ड्यू फॅक्टरचा फारसा परिणाम होणार नाही; पण नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

अंतिम लढत
ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
स्थळ : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम
वेळ : रात्री 7.30 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news