राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण अत्यल्प 

राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण अत्यल्प 
पुणे : राज्यात खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयांमधील अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रत्यारोपणतज्ज्ञांचा अभाव, जनजागृतीमधील कमतरता आणि इच्छाशक्तीची उणीव, अशा कारणांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये अवयवदानाची चळवळ शिथिल झाली आहे.  राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेकडून (सोट्टो) मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै 2023 या कालावधीत खासगी रुग्णालयांमध्ये 72 दात्यांचे, तर शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ 2 दात्यांचे अवयवदान झाले. एकूण 74 दात्यांकडून मिळालेले 220 अवयव रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. यापैकी 215 प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयांमध्ये, तर 5 शासकीय रुग्णालयांमध्ये पार पडल्या.
जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत खासगी रुग्णालयांमध्ये 101 दात्यांचे अवयवदान आणि शासकीय रुग्णालयांमध्ये 4 दात्यांचे अवयवदान झाले. अवयवदानामुळे 298 रुग्णांमध्ये 305 अवयवांचे प्रत्यारोपण पार पडले. 305 अवयवांपैकी 290 अवयव खासगी रुग्णालयांत, तर 8 अवयवांचे शासकीय रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
महात्मा फुले योजनेंतर्गत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. सरकारी रुग्णालयांत प्रत्यारोपणासाठी चार लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, तर खासगी रुग्णालयांत पाचपट खर्च येतो. मात्र, सरकारी रुग्णालयांकडून प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा प्राधान्याने विचार केला जात नाही.  ससून सर्वोपचार रुग्णालयात जानेवारी 2018 ते मे 2023 या कालावधीत 584 अवयव प्रत्यारोपणांना मान्यता दिली होती. या कालावधीत केवळ 15 अवयवांचे प्रत्यारोपण झाले.
रुग्णालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी गेल्या पाच महिन्यांत रुग्णालयाने केवळ एकच अवयव प्रत्यारोपण केले आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले, 'कोरोना काळात नियोजित अवयव प्रत्यारोपणाला स्थगिती देण्यात आली होती. यकृत प्रत्यारोपण परवाना नूतनीकरण लवकरच होईल. त्यानंतर हृदय प्रत्यारोपणासाठीही परवानगीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.'

शासकीय रुग्णालयांमध्ये अत्यल्प प्रमाण का?

  • नेफ्रोलॉजिस्ट किंवा हिपॅटोलॉजिस्टसारख्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, आयसीयू सुविधांचा अभाव आणि इच्छाशक्तीचा अभाव.
  • प्रत्यारोपणानंतर रुग्णाला किमान पुढील 4-5 दिवस अतिदक्षता विभागात ठेवणे आवश्यक असते. अनेक अत्यवस्थ रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याने एकाच रुग्णाला 5-6 दिवस ठेवणे शक्य होत नाही.
  • अनेक दशकांनंतरही सरकारी रुग्णालयांमध्ये केवळ संसर्गजन्य रोग व्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news