लिंगनूर, प्रवीण जगताप : महामार्ग हे वेळ बचतीच्या सोयींसोबत महाघातांचे कारण ठरत आहे. वाहनधारक, वाहतूक शाखा, वाहनांचे मेकॅनिझम, त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष, बांधणीतील त्रुटी, प्रवासी वाहनांच्या न होणार्या मेकॅनिकल तपासण्या, सर्व्हिस रोडवरून घ्यायची काळजी, टायर, टायर मधील हवा, ब्रेक गिअर क्लच या बाबींकडे असणारे दुर्लक्ष अशा अनेकविध कानाडोळा झालेल्या गोष्टींमुळे पापणी उघडायच्या महामार्गावर जीव मृत्यूच्या दाढेत जात आहे. वाहतूक शाखा, पोलिस प्रशासन, वाहन निरीक्षण, रस्ते प्राधिकरण विभाग संबंधित आदी विविध विभाग सक्षमपणाने व डोळसपणे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. सोयी सुविधांसाठी बनवलेले महामार्ग हे अपघातांची समृद्धी करणारे ठरू नयेत याची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी बनली आहे.
सांगली जिल्हाही या समस्येला अपवाद नाही. सांगली जिल्ह्यातील प्रमुख चारही राष्ट्रीय महामार्गांवर अपघातांची संख्या आता वाढू लागली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या पुणे- बंगळूर, रत्नागिरी- नागपूर, गुहागर- विजापूर हे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहेत. हे राष्ट्रीय महामार्ग आता जणू मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत. रत्नागिरी- नागपूर महामार्गावर अगदी अलीकडे बोलेरो ट्रॅक्टर धडकेत एकाच वेळी सहाजणांचा झालेला मृत्यू हे ताजे उदाहरण आहे.
या चार महिन्यांतील आकडेवारी पाहिली, तर मृत्यू आकडे व अपघात आकडे वाढलेलेच दिसून येतात. अशात समृद्धी महामार्गवर नागपूर- मुंबई या अतिजलद समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याकडे जाणार्या खासगी बस दुभाजकावर आदळून अपघात होऊन पुढे स्फोटात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातसुद्धा अपघातांची वाढत निघालेली आकडेवारी पाहून येथेही काळजी घेण्याची गरज आहे.
अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून अद्यापही प्रभावी उपाययोजना दिसून येत नाहीत.
मृत्यूसंख्या वाढण्यात प्रवासी वाहनांचे दोष तपासणार कोण :
मृत्यसंख्या अधिक वाढत जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रवासी वाहतूक करणार्या गाड्यातील सदोष यंत्रणा हेच ठरत आहेत. सांगली जिल्ह्यातसुद्धा चार महामार्ग व काहीच राज्यमार्ग असून, येथून मोठ्या प्रमाणावर पुणे मुंबई, ठाणे, नांदेड लातूर, हैदराबाद, सुरत आदी शहरांकडे दररोज शेकडो ट्रॅव्हल्स ये-जा करीत असतात. पण ट्रॅव्हल्स बाबतीतसुद्धा आता वाहतूक नियंत्रण शाखा व मॅकनिझम तपासणीबाबत आवश्यक संबंधित विभागाने आता काटेकोरपणे तपासण्या करण्याची गरज आहे.
ट्रॅव्हल्समध्येही टायर, गिअर, ब्रेक, क्लच यांची तपासणी व्हावी, कमी जागेत जास्त सीट्स बसवून आरामदायीपणा कितपत कमी केला आहे हेही पाहायला हवे. (ट्रॅव्हल्स्मध्ये एकावेळी आत दोन माणसेही ये- जा करू शकत नाहीत इतका अरुंद रस्ता जवळपास सर्वच ट्रॅव्हल्समध्ये दिसून येतो) ट्रॅव्हल्सची रचना कोणत्या रस्त्याकरिता कितपत योग्य आहे. त्यांचे रस्त्याला जमिनीलगत खेटून असणारे पत्रे अपघाताचे कारण ठरू नयेत, त्यांची उंची योग्य आहे का? अन्यथा केवळ दुभाजक अथवा किरकोळ बांधकामास वाहनास पत्रा ऐन वेगात अडकल्यास गतीमुळे वाहन पलटी होऊन मोठा धोका निर्माण होतो. तसेच एअर कंडिशन असले तरीही चुकून ते बंद पडल्यास गुदमरणे सुरू होते, अशा अडचणी तपासायला हव्यात. डिझेल टाकी गाडीचा अपघात झाला तरी फुटू नये, अशा काही नव्या सुधारणाही अपेक्षित आहेत. हीच बाब मोठ्या जीप गाड्या, प्रवासी वाहने याबाबतीत लागू होते.
वाहतूक कितपत सुरक्षित?
राष्ट्रीय व राज्य महामार्गावर विविध मोठया धार्मिक यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, प्रचार सभा, वारी, लग्नसोहळा, परिषदा, मेळावे यासाठी ट्रक, ट्रॅक्टर टेम्पोतूनदेखील प्रवासी वाहतूक केली जाते, यावेळी वाहतूक शाखेचे नियम कोठे जातात? शिवाय तीर्थक्षेत्र व धार्मिक यात्रा मध्येही ट्रॅव्हल्समधून बांधलेल्या खासगी गाड्यातून प्रवासी वाहतूक होत असते. यावेळी वाहन तपासणी व नियंत्रण या उपाययोजना यांची किमान अंमलबजावणी आवश्यक आहे.
नियम पाळणार्यांचा बळी :
राष्ट्रीय महामार्गाचे नियम न पाळणे, नादुरुस्त वाहने ठेवणे, वाहनांचा वेळेवर मेंटेनन्स न करणे या चुका अनेक वाहनधारक यांच्याकडून होतात.
या हव्यात उपाययोजना : 1) कडक वाहन तपासणी 2) वेग नियंत्रणसाठी पेट्रोलिंग गन सिस्टीम प्रभावी करणे 3) पोलिसांना तडजोडी ऐवजी ऑनलाईन दंड यंत्रणा प्रभावी करणे 4) दर 50 किलोमीटरवर कमानीवर वेग तपासणी मशीन 5) सर्व्हिस रोडवर विविध फलक रेडियमचा वापर 6) प्रवासी वाहतूक वाहनांसाठी ट्रॅव्हल्ससाठी मॅकनिझम तपासणी व दोषपूर्ण गाड्यांवर कडक कारवाई 7) शासकीय वाहने व वाहनचालक यांनाही सदर नियम लागू करणे 8) राष्ट्रीय महामार्गावर मॉर्निंग वॉक करणार्याना समज देऊन प्रबोधन करणे 9) वेग मर्यादा, वळण, सर्व्हिस रोड ठिकाणी विविध रेडियम फलक अॅलर्ट सिग्नल यंत्रणा बसवणे 10) ऑनलाइन दंडाची वसुली प्रभावी करणे, 11) हायवे पोलिस, मेकॅनिझम तपासणारी यंत्रणा यांची संयुक्त मोहीम उभी करण्याचा प्रयत्न करणे.
वाढत्या अपघातांची ही आहेत कारणे
वाहतूक शाखेचे पेट्रोलिंग अपुरे, स्पीड गन मोजणारी मशीन एखाद्या ठिकाणी उभ्या असतात, वाहनांची कोणतीही मेकॅनिकल तपासणी शासकीयस्तरावर होत नाही, विशेषतः प्रवासी वाहनांच्या टायरची कोणत्याही प्रकारची साधी पाहणीही केली जात नाही, गिअर ब्रेक क्लच आदि महत्वाच्या बाबी अनेक प्रवासी वाहनात नादुरुस्त किंवा बेभरवशी असतात. स्पीड कंट्रोल करण्यासाठी लावलेले आटोमॅटिक कमान मशीन हायवेवर 200 किलोमीटरवर एक आहेत, त्यांची संख्या कमी आहे, वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही, बेदरकारपणे वाहन चालविणारे अथवा कोणतेही नियम मोडणारे तडजोडीत जागेवर सोडले जातात, ओव्हरलोड गाड्या मोजण्याची ठिकठिकाणी अद्ययावत यंत्रणा नाही. सर्व्हिस रोडवरून महामार्गावर येताना वाहनधारक काळजी घेत नाहीत, लेनचे नियम सहज मोडले जातात.