‘ट्विटर’वर आता दोन तासांचाही व्हिडीओ, ब्‍ल्‍यू टिक धारकांनाच सुविधा

‘ट्विटर’वर आता दोन तासांचाही व्हिडीओ, ब्‍ल्‍यू टिक धारकांनाच सुविधा

वॉशिंग्टन : एलन मस्क यांनी 'ट्विटर'ची मालकी घेतल्यापासून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल दिसून येत आहेत. आता ट्विटरचे ब्ल्यू टिकसह व्हेरिफाईड सदस्य ट्विवटर प्लॅटफॉर्मवर 2 तासांपर्यंतचे व्हिडीओ अपलोड करू शकतील. ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विट करून या नव्या फीचरची माहिती दिली आहे. तथापि, वापरकर्ते कमाल 8 जीबीपर्यंतचेच व्हिडीओ अपलोड करू शकतात. यापूर्वी, हे वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर 1 तास (जास्तीत जास्त 2 जीबी) पर्यंतचे व्हिडीओ अपलोड करू शकत होते.

सामान्य ट्विटर वापरकर्ते (ब्ल्यू टिक नसलेले सदस्य) हे फीचर वापरू शकणार नाहीत. ज्याला ट्विटरवर दोन तासांपर्यंतचा व्हिडीओ अपलोड आणि शेअर करायचा असेल, त्याला ट्विटरचे मासिक ब्ल्यू सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. नॉन-ब्ल्यू टिक सदस्य सध्या फक्त 140 सेकंद (2 मिनिटे, 20 सेकंद) पर्यंतचे व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करू शकतात.

ब्लू सबस्क्रिप्शन सेवेची किंमत भारतातील अँड्रॉईड आणि आयओएस मोबाईल वापरकर्त्यांसाठी दरमहा 900 रुपये आहे. वेब वापरकर्ते 650 रुपये प्रति महिना ब्ल्यू सबस्क्रिप्शन सेवा घेऊ शकतात. मस्क यांना 2023 च्या अखेरीस ट्विटरला आर्थिकद़ृष्ट्या मजबूत करायचे आहे. महसूल वाढवण्यासाठी त्यांनी ब्ल्यू सबस्क्रिप्शन सेवेत बदल केले आहेत.

ट्विटरने गेल्या महिन्यात अक्षर मर्यादा 280 वरून 10,000 पर्यंत वाढवली. म्हणजेच तुम्ही इथे कोणताही अडथळा न येता संपूर्ण लेख लिहू शकता. एवढेच नाही तर आता ट्विटरवर बोल्ड आणि इटालिक असे टेक्स्ट फॉरमॅटिंग देखील वापरता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news